१०-१२ वी पास; पण इयत्ता दुसरीचे वाचता येईना, २५ टक्के विद्यार्थ्यांची पीछेहाट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 06:04 AM2024-01-18T06:04:09+5:302024-01-18T06:13:23+5:30
विशेष म्हणजे या वयोगटातील मुली भाषेतील दुसरीचा मजकूर वाचण्यात, तर मुले हे गणित सोडविण्यात पुढे असल्याचे दिसले.
मुंबई : उच्च शिक्षणाच्या उंबरठ्यावर असलेल्या १४ ते १८ वर्षे वयोगटातील ९ ते १२वीच्या २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषांमधील दुसऱ्या वर्गाचे पुस्तक नीट वाचता येत नसल्याचे धक्कादायक वास्तव प्रथम फाऊंडेशनच्या 'असर' अहवालातून समोर आले आहे. एवढेच नव्हे, तर २०१७ च्या तुलनेत भाषिक व गणितीय कौशल्यातही विद्यार्थ्यांची पीछेहाट झाल्याचे अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे या वयोगटातील मुली भाषेतील दुसरीचा मजकूर वाचण्यात, तर मुले हे गणित सोडविण्यात पुढे असल्याचे दिसले.
दैनंदिन व्यवहारातही पिछाडीवर
दैनंदिन जीवनात लागणारी कौशल्ये तपासण्यासाठी मुलांना मोजपट्टीने एका वस्तूचे माप शून्य आरंभबिंदूपासून काढण्यास सांगण्यात आले. ते ८५ टक्के मुलांना जमले.
पट्टी आरंभबिंदूपासून हलविण्यात आली तेव्हा त्या वस्तूचे मोजमाप ४०% मुलांनाच काढता आले. बँक व्यवहारासाठी लागणाऱ्या व्यावहारिक कौशल्यांचाही मुलांकडे अभाव असल्याचे दिसून आले.
पाच कौशल्यांची पाहणी
या अहवालाच्या निमित्ताने करिअरच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलांच्या क्षमता तपासण्यात आल्या.
२०१७ साली असरने असा प्रयत्न केला होता. यावेळी प्रादेशिक भाषा, इंग्रजी भाषा वाचन, गणिती, दैनंदिन जीवनात करावी लागणारी वित्तीय गणना, डिजिटल जागरूकता ही पाच कौशल्ये तपासण्यात आली.
मुलांच्या (७०.९ टक्के) तुलनेत मुलींनी (७६ टक्के) त्यांच्या प्रादेशिक भाषेतील दुसरीचा मजकूर वाचण्यात चांगली कामगिरी
बजावली. तुलनेत मुले अंकगणित आणि इंग्रजी वाचनात पुढे असल्याचे दिसून आले.