‘कट ऑफ’ पुन्हा वाढले; बहुतांश नामांकित महाविद्यालयांच्या जागा फुल्ल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 05:27 AM2022-09-16T05:27:55+5:302022-09-16T05:28:21+5:30
अकरावी प्रवेश दुसरी विशेष फेरी : नामांकित महाविद्यालयांचे कट ऑफ ८० टक्क्यांच्या वर स्थिरावल्याने त्याखालील गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची मात्र यामुळे धाकधूक वाढली आहे.
मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या दुसऱ्या विशेष फेरीत मुंबई विभागातून २६ हजार ३७ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली असून, यासाठी एकूण ३९ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. अकरावीच्या विशेष फेरीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीतही महाविद्यालयांचा कट ऑफ वाढलेला पाहण्यास मिळाला. एकीकडे एचआर, रुईया, पोदारसारख्या नामांकित महाविद्यालयांच्या जागा फुल्ल झाल्या आहेत, तर दुसरीकडे भवन्स, मिठीबाईसारख्या महाविद्यालयांतील कला , वाणिज्य, विज्ञान शाखेच्या कट ऑफमध्ये १३ ते १५ टक्क्यांहून वाढ दिसून आली.
नामांकित महाविद्यालयांचे कट ऑफ ८० टक्क्यांच्या वर स्थिरावल्याने त्याखालील गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची मात्र यामुळे धाकधूक वाढली आहे. अकरावीच्या विशेष फेरीच्या दुसऱ्या यादीत पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती.
१७ सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चिती
या गुणवत्ता यादीमध्ये कला शाखेच्या २००५ , वाणिज्य शाखेच्या १५ हजार ७४९, विज्ञान शाखेच्या ७ हजार ९४८ आणि एचएसव्हीसीच्या ३३५ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळालेल्या आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये पहिला पसंतीक्रम मिळालेले एकूण १४ हजार ९३९ विद्यार्थी आहेत. दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय प्राप्त ३ हजार ८१३ आणि तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय प्राप्त २ हजार २५७ विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांनी येत्या १७ सप्टेंबरपर्यंत आपले प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.