अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश नोंदणीला मुदतवाढ, आतापर्यंत १ लाख २९ हजारांहून अधिक अर्जांची पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 11:46 AM2023-06-14T11:46:52+5:302023-06-14T11:47:01+5:30
१५ ते १७ जून दरम्यान हरकती नोंदविता येणार
लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: केंद्रीय प्रवेश समितीकडून सुरू असलेल्या अकरावीसाठी असलेल्या प्रवेश नोंदणीसाठी १४ जून रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्रवेश नोंदणी म्हणजे प्रवेश प्रक्रियेत भाग- १ असून आतापर्यंत राज्यातील ३ लाख ९१ हजार विद्यार्थ्यांनीच भाग १ ची प्रक्रिया पूर्ण केली आहे. यात मुंबई विभागातून आतापर्यंत २ लाख ६२ हजार ८५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर ३२ विद्यार्थ्यांनी अर्ज मागे घेतले आहेत. तर १ लाख २९ हजार २०४ विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे.
काही कारणांमुळे विद्यार्थ्यांना नोंदणी आणि प्रवेश अर्जाचा भाग एक भरता आला नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिक्षण विभागाने प्रवेश अर्जाचा भाग एक ही मुदतवाढ दिली. तसेच अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी २१ जूनला जाहीर होईल.
राज्यात अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३ लाख २९ हजार १९८ विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी पूर्ण झाली आहे. २ लाख ५२ हजार ४२३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरले आहेत.
....म्हणून प्रक्रियेस मुदतवाढ
- राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला १४ जूनला मिळणार आहे.
- त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत प्रवेश अर्जाचा भाग एक भरता आला नाही. त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
१५ ते १७ जून दरम्यान हरकती नोंदविता येणार
१५ जूनला सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. १५ ते १७ जून दरम्यान सर्वसाधारण गुणवत्ता यादीवर आक्षेप, हरकती नोंदविता येतील. १७ जूनला प्रवेश अर्जाचा भाग दोन भरता येईल. पहिली अंतिम गुणवत्ता यादी २१ जूनला जाहीर करण्यात येईल. तर २१ ते २४ जून या कालावधीत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल. राखीव जागा अंतर्गत प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांना १८ ते २० जून या कालावधीत अर्ज करता येईल. कोट्यांतर्गत प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी २१ जूनला जाहीर केली जाईल. कोट्यांतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश २१ ते २४ जून या कालावधीत निश्चित करण्यात येतील. तर २४ जूनला कोट्यांतर्गत रिक्त जागा घोषित करता येतील असे स्पष्ट करण्यात आले.