बारावीच्या पुनर्मूल्यांकन निकालाला विलंब! मंडळाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 07:45 AM2023-06-17T07:45:46+5:302023-06-17T07:45:56+5:30
उच्च शिक्षणासाठी भवितव्य टांगणीला
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेच्या निकालानंतर पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अद्याप निकाल न मिळाल्याने त्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागते की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश पूर्वपरीक्षाचा म्हणजेच एमएचटी सीईटी, जेईई, नीट यांचा निकाल जाहीर होऊन, १५ जूनपासून सीईटी सेलकडून ऑनलाइन नाव नोंदणी प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे बारावीच्या निकालाबद्दल पुनर्मूल्यांकनाच्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीवर लागले आहे.
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. मात्र या अभ्यासक्रमांसाठी पूर्वपरीक्षा गुणांसह बारावीला किमान ७५ टक्के गुण आवश्यक आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ५ ते १० गुण कमी मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी बारावीच्या काही विषयांच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत. मात्र त्यांच्या अर्जाबद्दल मंडळाकडून अद्याप कोणतीही प्राथमिक प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली नाही. या अशा कारभारामुळे त्यांचा बारावी परीक्षेचा निकाल विलंबाने लागल्यास हुशार विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणालाच मुकावे लागते की काय, अशी भीती वाटत आहे.
शिक्षणमंत्र्यांना निवेदन
- राज्य मंडळाच्या या भोंगळ कारभाराबाबत मुंबई विद्यापीठातील युवासेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवत त्वरित हा निकाल जाहीर केला जावा, अशी मागणी केली आहे.
- पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास युवासेना तीव्र आंदोलन छेडण्याचा असा इशाराही त्यांनी दिला आहे.