अकरावी प्रवेशाचे कोट्यांतर्गत १७ हजार ५८९ प्रवेश निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 02:40 AM2020-08-28T02:40:51+5:302020-08-28T02:41:29+5:30
आवश्यकतेनुसार भाषिक समूहातील विद्यार्थ्यांनाही मिळणार प्रवेश
मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत यंदा इनहाउस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यांतर्गत ८४३ महाविद्यालयांत एकूण १ लाख २३ हजार ४१३ जागा उपलब्ध आहेत. आतापर्यंत त्यापैकी इनहाउस जागांवर ७०२७, अल्पसंख्याक जागांवर ९८११ आणि व्यवस्थापन जागांवर ७५१ प्रवेश निश्चित झाले आहेत. मुंबई विभागात कोट्यांतर्गत असलेल्या जागांवर आतापर्यंत एकूण १७ हजार ५८९ प्रवेशनिश्चिती झाली आहे.
कोटा प्रवेशाची मुदत संपली असली तरी नियमित फेऱ्यांदरम्यान अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश सुरू राहणार असल्याचे विभागीय संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आले. यंदा अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागात कला, वाणिज्य, विज्ञान आणि एचएसव्हीसी शाखांच्या मिळून एकूण ३ लाख २० हजार ७२० जागा उपलब्ध आहेत. त्यातील १ लाख ९७ हजार ३०७ जागा या अकरावी केंद्रीय आॅनलाइन प्रवेशासाठी, तर१ लाख २३ हजार ४१३ जागा कोट्यांतर्गत प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
यंदा शून्य फेरी दरम्यानच कोटा प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षण संचालनालयाकडून सर्व विभागीय उपसंचालक कार्यालयांना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, आता कोटा प्रवेशाची प्रक्रिया झाली असली तरी नियमित फेऱ्यांदरम्यान अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यातील जागांवरचे प्रवेश सुरू राहणार आहेत.
धार्मिक अल्पसंख्याक कोट्याच्या जागा भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांद्वारे भरता येणार
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ३० आॅगस्ट रोजी जाहीर होणार आहे. अल्पसंख्याक महाविद्यालयातील ५० टक्के जागांवर धार्मिक अल्पसंख्याक समूहातील विद्यार्थी उपलब्ध होऊ न शकल्यास त्या जागा भाषिक अल्पसंख्याक समूहातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महाविद्यालयांना भरणे बंधनकारक आहे. त्यानंतरही अल्पसंख्याक जागा उरल्यास त्या केंद्रीय समितीकडे प्रत्यार्पित करता येतील. त्यानंतर त्या जागांवर केंद्रीय आॅनलाइन पद्धतीने गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जाणार असल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले.