दहावीत ९०% मिळवणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना २ लाखांचं अनुदान; धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 05:58 PM2021-06-24T17:58:15+5:302021-06-24T17:59:51+5:30

अनुसूचित जातीतील गरीब कुटुंबातील मुलांना MH-CET, JEE, NEET यांसारख्या व्यावसायिक अभयसक्रमांच्या पूर्वतयारीसाठी ही रक्कम लाभदायक ठरणार आहे.

2 lakh grant to Scheduled Caste students who get 90% in 10th; Dhananjay Munde's big decision | दहावीत ९०% मिळवणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना २ लाखांचं अनुदान; धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय

दहावीत ९०% मिळवणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना २ लाखांचं अनुदान; धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय

Next
ठळक मुद्देबार्टीच्या ३०व्या नियामक मंडळाची दि. २१ जून रोजी बैठक पार पडली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न २.५ लाखांच्या आत असणे अनिवार्य असणार आहे.विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार

मुंबई - अनुसूचित जातीतील १० वीच्या परीक्षेत ९०% किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ११ वी व १२ वी या दोन वर्षात प्रत्येकी १ लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

अनुसूचित जातीतील गरीब कुटुंबातील मुलांना MH-CET, JEE, NEET यांसारख्या व्यावसायिक अभयसक्रमांच्या पूर्वतयारीसाठी ही रक्कम लाभदायक ठरणार आहे. याबाबत विद्यार्थी व पालक संघटनांकडून करण्यात येणारी मागणी पाहता ही योजना लागू करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी निर्देश दिले होते. बार्टीच्या ३०व्या नियामक मंडळाची दि. २१ जून रोजी बैठक पार पडली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

कशी ठरणार पात्रता?

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात येत असलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न २.५ लाखांच्या आत असणे अनिवार्य असणार आहे. तसेच शासकीय सेवेत नोकरीला असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना ही योजना लागू असणार नाही. उत्पन्नाचा व जातीचा प्रमाणित दाखला देणे अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे या योजनेमधील लाभार्थी संख्या अमर्यादित असणार आहे! अशी माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या, कमी पगारावर किंवा कंत्राटी स्वरूपात किंवा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार असून, या योजनेची पारदर्शक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांची असणार आहे. या योजनेचा लाभ तळागाळातील गरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडवण्यासाठी मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून निश्चितच ही योजना सफल करू, असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

Read in English

Web Title: 2 lakh grant to Scheduled Caste students who get 90% in 10th; Dhananjay Munde's big decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.