दहावी-बारावीची ३०० कॉपी प्रकरणे, कोकण विभागात नाही एकही गैरप्रकार
By सीमा महांगडे | Published: April 13, 2022 08:18 AM2022-04-13T08:18:45+5:302022-04-13T08:19:02+5:30
राज्य शिक्षण मंडळाच्या यंदाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेत एकूण ३३४ गैरमार्ग प्रकरणे सापडली आहेत
सीमा महांगडे
मुंबई :
राज्य शिक्षण मंडळाच्या यंदाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेत एकूण ३३४ गैरमार्ग प्रकरणे सापडली आहेत. यामध्ये दहावीच्या ९९ तर बारावीच्या २३५ गैरमार्ग प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. यात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक १२० तर कोकण विभागात शून्य कॉपीची प्रकरणे आढळली.
राज्यात दहावीची परीक्षा ५,०५० मुख्य परीक्षा केंद्रांवर, तसेच १६,३३५ उपकेंद्रांवर घेण्यात आली. यंदा पहिल्यांदाच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून होम सेंटरची सुविधा परीक्षेसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, बऱ्याच कालावधीनंतर प्रत्यक्ष परीक्षा देणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी सुविधेचा गैरफायदा घेतल्याने, गैरमार्ग प्रकरणांची संख्या वाढली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी संस्थेची मान्यता रद्द करण्याच्या इशाऱ्यानंतर कॉपी प्रकरणात थेट घसरणही दिसून आली. बारावीची सर्वाधिक कॉपी प्रकरणे ही अमरावती जिल्ह्यात सापडली असून, त्यांची संख्या १२० आहे. कोकण विभागात बारावीच्या परीक्षेदरम्यान एकही कॉपी प्रकरण आढळले नाही.
दहावीच्या परीक्षेत एकूण ९९ गैरमार्ग प्रकरणे पकडली असून, सर्वाधिक गैरमार्ग प्रकरणे नागपूर (३१) व अमरावती (२५) विभागात आढळली, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.