पॉलिटेक्निकच्या ३७ टक्के विद्यार्थ्यांची मराठीला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2022 05:31 AM2022-10-11T05:31:08+5:302022-10-11T05:31:21+5:30

द्विभाषिक अभ्यासक्रमासाठी ३१,१६३ विद्यार्थ्यांचे प्रवेश

37 percent of polytechnic students prefer Marathi | पॉलिटेक्निकच्या ३७ टक्के विद्यार्थ्यांची मराठीला पसंती

पॉलिटेक्निकच्या ३७ टक्के विद्यार्थ्यांची मराठीला पसंती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमाकडील आकर्षण वाढत असले, तरी मातृभाषेच्या माध्यमातील शिक्षण अधिक परिणामकारक असते. शिक्षणशास्त्रातील बहुतेक अभ्यासकही मातृभाषेच्या वा परिसर भाषेच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा आग्रह धरत असतात. याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील ३६५ पैकी १६३ तंत्रनिकेतन संस्था द्विभाषिक अभ्यासक्रमाचे धडे देणार आहेत.  प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम (पॉलिटेक्निक) मराठी-इंग्रजीतून विद्यार्थ्यांना यंदापासून शिकता येणार असल्याने यंदा प्रवेश घेतलेल्या ८४ हजार ४५२ पैकी ३१ हजार १६३ विद्यार्थ्यांनी या दोन्ही भाषेतून शिक्षण घेण्याचा पर्याय निवडला आहे.

शालेयच नव्हे, तर उच्च शिक्षण, विशेषत: विज्ञान-तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षणही मातृभाषेच्या माध्यमातून मिळाल्यास ते अधिक परिणामकारक होऊ शकते. अभियांत्रिकी शिक्षणाबाबत असे धोरण आखण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) या अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षणाच्या राष्ट्रीय शिखर संस्थेने पावले उचलली आहेत. त्याला प्रतिसाद देत राज्याने अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम इंग्रजीबरोबरच मराठीतूनही उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.  यामुळे २०२१-२२ पासून व त्या पुढील दरवर्षी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांची अध्यापन प्रक्रिया मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) भाषेत असणार आहे. 

राज्यभरात असलेल्या ३६५ पैकी १६३ संस्थांनी पुढाकार घेत शिकवण्याचा पर्याय स्वीकारला आहे. दोन्ही भाषेत शिक्षण घेण्यासाठी यंदाच्या प्रवेशात तब्बल ८४ हजार ४५२ विद्यार्थ्यांपैकी ३१ हजार १६३ विद्यार्थ्यांनी हा पर्याय निवडला आहे. इंग्रजीसह मराठी भाषेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी सांगितले. 

राेजगारासाठी उपयुक्त
रोजगार मिळविण्यासाठी किंवा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त असल्यानेच अभियांत्रिकी पदविकांची मागणी कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी अभियांत्रिकी पदविका हा एक उत्तम पर्याय असल्याचे डॉ. अभय वाघ यांनी अधोरेखित केले.

Web Title: 37 percent of polytechnic students prefer Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.