विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 07:46 AM2024-11-27T07:46:34+5:302024-11-27T07:46:57+5:30
परीक्षांआधी नववी, दहावीसाठीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना
मुंबई : 'यू डायस प्लस' प्रणालीमधून पूर्वप्राथमिक तसेच इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची 'अपार आयडी' नोंदणीसाठीची मुदत संपण्यासाठी आता चार दिवसच शिल्लक आहेत. मात्र, काही शाळा आणि महाविद्यालयांमधून २५ टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी अपूर्ण असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नोंदणी होण्यासाठी येत असलेल्या अडचणींबाबत मंगळवारी पश्चिम विभाग शिक्षक निरीक्षकांकडून शिक्षक आणि मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली. बैठकीत ८०० मुख्याध्यापक उपस्थित होते.
या बैठकीत परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या असून, शिक्षक आणि मुख्याध्यापकांना अपार आयडी रजिस्ट्रेशनसाठी मार्गदर्शन आणि अपार आयडी आणि आधारकार्डबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी शिक्षण विभागाकडून तज्ज्ञ व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या आधारकार्डवर पत्ता बदलणे, नावातील दुरुस्ती, आडनावात दुरुस्ती अशा कारणांमुळे आधारकार्ड देण्यास वेळ लागत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या उत्तर विभाग मुख्याध्यापकांच्या सहविचार बैठक चर्चा झाली. शाळांमधून नोंदणी करत असताना तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी होत नसेल तर सरल किंवा यू किवा यू डायसवरून जिल्हा लॉगिनमध्ये नोंदणी पूर्ण करता येईल. अशा शाळांमधील कर्मचारी उत्तर विभाग कार्यालयात येऊन नोंदणी अपडेट करू शकतील, अशी माहिती उत्तर विभाग शिक्षक निरीक्षक मुश्ताक शेख यांनी दिली.
नोंदींमध्ये शिक्षण विभागांतर्गत तोडगा सध्या रजिस्टरमधील विद्यार्थ्यांच्या नावांच्या नोंदणीमध्ये आणि आधारकार्डावरील नोंदीमध्ये फरक असणे ही मोठी समस्या शाळांसमोर आहे. त्यावर उपाय म्हणून अशा विद्यार्थ्यांची यादी करून नाव बदलाचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवला जातो. त्यानंतर शिक्षण निरीक्षकांकडून कागदपत्रे तपासून चौकशीनंतर शाळा रजिस्टर नोंदीमध्ये बदल केला जातो. या प्रक्रियेस १ ते दीड महिन्याचा कालावधी जात असला तरी ही सर्व प्रक्रिया शाळांतर्गत होते. त्यामुळे अशा काही विद्यार्थ्यांच्या कमी शिक्षित पालकांना शिक्षकांकडून नाव बदलात मदत होत असे.
अपार आयडीमुळे विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक डेटा एकत्र मिळणे विद्यार्थ्यांसाठी आणि शाळा आणि महाविद्यालयांसाठी खूपच सोयीचे आहे. मात्र, यासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत पालक फारसे गंभीर नाहीत. त्याचे महत्त्व पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विभागवार पालकांच्या बैठक घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच आधारकार्ड अपडेटचे कॅम्प शाळांमध्ये घेतल्यास अपडेट प्रक्रिया लवकर होईल. - सचिन गवळी, प्रवक्त्ता, बृहन्मुंबई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटना