आरटीई प्रवेशाच्या ४० टक्के जागा रिक्त; प्रवेशाचा आज शेवटचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 09:11 AM2022-05-10T09:11:57+5:302022-05-10T09:12:11+5:30
आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांना चांगल्या शाळांमध्ये मोफत शिक्षण घेता यावे यासाठी राखीव जागांवर आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू झाली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशांना दिलेल्या दुसऱ्या मुदतीचा आज शेवटचा दिवस आहे. अद्यापही राज्यात प्रवेशासाठी निवड झालेल्या ३० हजार विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती बाकी आहे. रिक्त जागांपैकी मुंबईतीलही ४० टक्के जागावर प्रवेशनिश्चिती होणे बाकी आहे.
एकीकडे मोठ्या शाळांमधील आरटीई प्रवेश सहज होत असताना दुसरीकडे इतर शाळांमध्ये प्रवेशनिश्चिती करण्यासाठी पालक फारसे उत्सुक नसल्याचे दिसत आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेश संथगतीने होत असल्याचे मत आरटीई अधिकारी व्यक्त करीत आहेत. या प्रवेशांना मुदतवाढ दिल्याने प्रतीक्षा यादीतील विद्यार्थीही प्रवेशासाठी ताटकळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांना चांगल्या शाळांमध्ये मोफत शिक्षण घेता यावे यासाठी राखीव जागांवर आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. यंदा प्रवेशासाठी अर्ज ही मोठ्या प्रमाणावर आले, तर प्रवेशनिश्चितीकडे पालक पाठ फिरवीत आहेत. दुसऱ्यांदा मुदतवाढ देऊनही राज्यात ३० हजार जागावर प्रवेश झाले नाहीत. पालकांना हव्या त्या शाळांत प्रवेश मिळत नसल्याने व बनावट अर्ज, प्रमाणपत्रे सादर केल्याची प्रकरणे समोर आल्याने जागा रिक्त राहत असल्याची माहिती समन्वयक देत आहेत.
आता मुदतवाढ नको
प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांना संधी द्या पहिल्या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ देऊन प्रवेशाची संधी देण्यात आली.
प्रवेशप्रक्रिया वेळेवर संपवायची असेल तर आता तिसऱ्यांदा मुदतवाढ न देता प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांना संधी द्या अशी मागणी काही पालकांकडून होत आहे.
खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये
२५% राखीव जागांसाठी काढलेल्या सोडत जाहीर झाली असून, राज्यभरातील ९ हजार ८६ शाळांत असलेल्या १ लाख १ हजार ९०९ जागांपैकी पहिल्या सोडतीत ९० हजार ६८८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. त्यातील ६० हजार ९८५ जागांवर अद्याप प्रवेशनिश्चिती झाली आहे.