शाळेचा पहिला दिवस घरातूनच, ऑनलाइन शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 05:49 AM2021-06-15T05:49:38+5:302021-06-15T05:49:52+5:30

लॉकडाऊनमुळे मागील वर्षीही विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाचा प्रत्यक्ष आनंद घेता आला नव्हता आणि यंदाही शिक्षक आणि वर्गशिक्षकांची तोंडओळख ऑनलाइनच करून घ्यावी लागेल.

50% attendance of online teachers from home on the first day of school | शाळेचा पहिला दिवस घरातूनच, ऑनलाइन शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती 

शाळेचा पहिला दिवस घरातूनच, ऑनलाइन शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी विद्यार्थी सुरक्षिताता लक्षात घेऊन तूर्तास नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाइन करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून (मंगळवार, १५ जून) राज्यातील बरेच विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुटीनंतर पुन्हा एकदा अभ्यासाला लागतील, मात्र ऑनलाइन पद्धतीनेच.

लॉकडाऊनमुळे मागील वर्षीही विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाचा प्रत्यक्ष आनंद घेता आला नव्हता आणि यंदाही शिक्षक आणि वर्गशिक्षकांची तोंडओळख ऑनलाइनच करून घ्यावी लागेल. दरम्यान, याही परिस्थितीत नवीन वर्ग मित्र, नवीन शिक्षक यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह कायम आहे. दरम्यान, विदर्भातील शाळांचे शैक्षणिक वर्ष २८ जूनपासून सुरू हाेईल.

शाळा सुरू झाल्यावर शिक्षकांना मात्र शाळांतील उपस्थिती बंधनकारक आहे. इयत्ता १० वी व १२ वीचा निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकनाचे काम सुरू असून, मर्यादित वेळेत यंदा निकाल जाहीर करायचे असल्याने राज्यातील विदर्भासह इयत्ता दहावी, बारावीला शिकवणाऱ्या शिक्षकांची शाळांमध्ये १०० टक्के उपस्थिती गरजेची असल्याच्या सूचना शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिल्या आहेत. तसेच इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती शाळांमध्ये बंधनकारक असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. साेबतच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसोबत प्राथमिक, माध्यमिक मुख्याध्यापक आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांचीही उपस्थिती अनिवार्य आहे.

शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार नवीन वर्षाची सुरुवात यंदा नवीन अभ्यासक्रमाने न होता उजळणीने होईल. मात्र, ती उजळणी कशी व कोणत्या घटकांची असावी, कोणत्या विद्यार्थ्यांची असावी, याबाबत शिक्षण विभागाकडून शाळा, मुख्याध्यापक, शिक्षकांना काहीच सूचना अद्याप आलेल्या नाहीत. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक वर्षासंदर्भात काहीच आराखडा विद्यार्थ्यांसमोर सादर करता येणार नाही, अशी खंत मुख्याध्यापक व्यक्त करत आहेत.

प्रवाहाबाहेरील विद्यार्थी
ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षण घेण्याची सोय नाही, ते विद्यार्थी गेल्या वर्षापासूनच ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले गेले आहेत. या विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल, याबद्दल शिक्षण विभागाने काहीच कार्यवाही केली नसल्याची नाराजी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

Web Title: 50% attendance of online teachers from home on the first day of school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा