इंजिनिअरिंगच्या ५१ हजार जागा रिक्त; तिसऱ्या फेरीअखेर १ लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 10:26 AM2024-09-11T10:26:55+5:302024-09-11T10:27:18+5:30
राज्यात कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या यंदा ४६,२९० जागा उपलब्ध असून, तिसऱ्या फेरीअखेर त्यामध्ये ३३,३५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत
मुंबई : राज्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या आहेत. इंजिनीअरिंगच्या कॅपच्या तिसऱ्या फेरीअखेर १,१२,९८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, अद्याप ५१,३५५ जागा रिक्त आहेत.
आता आणखी एक ‘ए कॅप’ फेरी होणार असून त्यानंतर संस्थांच्या पातळीवर उर्वरित जागा भरल्या जाणार आहेत. त्यातून आणखी काही विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्यात यंदा इंजिनीअरिंग प्रवेशासाठी १,६४,३३६ जागा उपलब्ध आहेत. त्यामध्ये कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि त्यासंबंधित शाखांना सर्वाधिक जागा असून, त्याच शाखांकडे विद्यार्थ्यांचाही अधिक कल असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या यंदा ४६,२९० जागा उपलब्ध असून, तिसऱ्या फेरीअखेर त्यामध्ये ३३,३५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नव्याने तयार झालेल्या शाखेच्या प्रवेशासाठी यंदा १८,६६८ जागा उपलब्ध असून त्यातील १३,५३१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.