जागा ५४०, अर्ज ५ लाख ५९ हजार! IIM-मुंबईमध्ये प्रवेशासाठी MBA इच्छुकांची प्रचंड गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 06:41 IST2025-03-28T06:40:44+5:302025-03-28T06:41:17+5:30
कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचेही अर्ज; गेल्यावर्षी प्रवेश घेण्यासाठी इच्छुकांची संख्या अवघी १३ हजार ५३४ होती.

जागा ५४०, अर्ज ५ लाख ५९ हजार! IIM-मुंबईमध्ये प्रवेशासाठी MBA इच्छुकांची प्रचंड गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दीड वर्षांपूर्वी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा (आयआयएम) दर्जा मिळालेल्या संस्थेत आता प्रवेशासाठी झुंबड उडाली आहे. एमबीएसाठी या संस्थेत ५४० जागांसाठी तब्बल ५ लाख ५९ हजार ८८७ अर्ज प्राप्त झाले आहेत.
पवईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (नीती) या संस्थेला दीड वर्षांपूर्वी आयआयएमचा दर्जा मिळाला. त्यामुळे संस्थेत प्रवेशासाठी गर्दी झाली आहे. गेल्यावर्षी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या अवघी १३ हजार ५३४ होती. केवळ आयआयएमचा दर्जा मिळाल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी उड्या मारल्याचे चित्र आहे.
२०२५ ते २०२७ या शैक्षणिक वर्षासाठी एमबीएला प्रवेश घेणाऱ्यांमध्ये नुकतेच पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांबरोबरच नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी उमेदवारांचाही भरणा आहे. त्यामुळेच यंदा संस्थेत प्रवेशासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे, अशी माहिती आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोजकुमार तिवारी यांनी दिली.
अभ्यासक्रम जागा अर्ज
- एमबीए (जनरल) ३३० २,६९,३५६
- एमबीए ऑपरेशन १८० ७७,६१८
- ॲन्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट
- एमबीए सस्टेनिबिलिटी मॅनेजमेंट ३० २,१२,९१३
कारणे काय?
गेल्यावर्षी आयआयएम मुंबईची प्रवेश प्रक्रिया या संकेतस्थळाच्या माध्यमातून झाली नव्हती तसेच नीती संस्थेचे आयआयएममध्ये रुपांतरण झाल्याचा फारसा प्रचार-प्रसार झाला नव्हता. मुंबई आर्थिक राजधानी असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे. म्हणूनच अधिक अर्ज आल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.