अकरावीसाठी राज्यात ९४ हजारांची नोंदणी; काही ठिकाणी तांत्रिक अडचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 06:28 AM2021-08-15T06:28:42+5:302021-08-15T06:29:05+5:30
राज्यातील इतर विभागीय महापालिका क्षेत्रांचा विचार केल्यास, अमरावती विभागात पहिल्या दिवशी १५५० विद्यार्थ्यांनी तर नागपूर विभागातून ३४०२ विद्यार्थ्यांनी अर्जनोंदणी केली आहे.
मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी राज्यात तब्बल ९४ हजार ४४७ विद्यार्थ्यांनी सायंकाळी ७ वाजेपर्यंत अर्जनोंदणी पूर्ण केली आहे. यामधील २४ हजार ६४९ विद्यार्थ्यांचे अर्ज प्रमाणितही झाले असून या विद्यार्थ्यांना १७ ऑगस्ट रोजी अर्जाचा दुसरा भाग म्हणजेच आवडीच्या महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरता येणार आहेत. यात पहिल्याच दिवशी सर्वाधिक अर्ज नोंदणी मुंबईत झाली असून अर्ज नोंदणीची संख्या ६६ हजार ४४५ आहे तर त्यानंतर पुण्यातील अर्ज नोंदणी जास्त असून त्याची संख्या १८ हजार ५६५ इतकी आहे.
राज्यातील इतर विभागीय महापालिका क्षेत्रांचा विचार केल्यास, अमरावती विभागात पहिल्या दिवशी १५५० विद्यार्थ्यांनी तर नागपूर विभागातून ३४०२ विद्यार्थ्यांनी अर्जनोंदणी केली आहे. नागपुरातून ३४०२ विद्यार्थ्यांनी अर्जनोंदणी केल्याची माहिती शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली. अर्जाचा पहिला भाग भरून अर्ज प्रमाणित केलेल्या विद्यार्थ्यांना मंगळवारी अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे. अर्जाच्या दुसऱ्या भागात महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरताना विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांच्या साहाय्याने मागील वर्षांचे कट ऑफ पाहून पसंतीक्रम भरावा असा सल्ला तज्ज्ञ अधिकारी देत आहेत.
राज्यात अर्जनोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ३५ हजार ९१२ विद्यार्थ्यांचे अर्ज पहिल्या दिवशी
लॉक करण्यात आले आहेत, तर ११ हजार २६३ विद्यार्थ्यांचे अर्ज
प्रमाणित होणे अद्याप बाकी आहे. ३८ हजार २८५ विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जाचे प्रवेश प्रक्रिया शुल्क
भरून प्रक्रिया अर्जनोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे.
काही ठिकाणी तांत्रिक अडचणी
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात अर्ज भरताना अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याची माहिती त्यांनी दिली. अनेक विद्यार्थ्यांचे अर्जाचे पहिले भाग संपूर्ण पद्धतीने सबमिट होत नव्हते, तर अनेकांचे जिल्ह्यांचे पर्याय निवडूनही त्यांची निवड अंतिम होत नव्हती. अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर दिलेल्या हेल्पलाइनवर विद्यार्थी, पालकांनी तक्रारी केल्या असता काही वेळाने या तक्रारीचे निवारण होईल, असे सांगण्यात येत होते.
राज्यभरात अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने व्हावी; सिस्कॉमच्या प्रमुख वैशाली बाफना
- एकीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे सोय नसताना ऑनलाइन शिक्षणाचा अट्टहास होतोय, तर दुसरीकडे महानगरे सोडून इतर ठिकाणी स्थानिक पातळीवर महाविद्यालयीन स्तरावर अकरावी प्रवेश प्रक्रिया पार पाडणे चूक असल्याचे सिस्कॉमच्या प्रमुख वैशाली बाफना यांनी म्हटले आहे.
- संपूर्ण महाराष्ट्रात पूर्वप्राथमिक ते पदव्युत्तर संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही केवळ आणि केवळ ऑनलाइन पद्धतीनेच व्हावे हीच सिस्कॉमची आग्रही मागणी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
विभाग - अमरावती - मुंबई - नागपूर - नाशिक - पुणे - एकूण
नोंदणी -१५५०- ६६४४५- ३४०२- ४४८५- १८५६५-९४४४७
प्रमाणित अर्ज - ४०३- १७९५२- ४५८- १०६१- ४७७५- २४६४९
प्रमाणपत्रे अपलोड केलेले - ७५८- ३२२२०- १३५५- २५८६- ९५०२- ४६४२१