लॉकडाऊनमध्ये मुंबईतील ९७ % विद्यार्थ्यांनी घेतले ऑनलाईन शिक्षण, पण ऑफलाईन शिक्षणालाच पालकांची पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 01:51 PM2021-01-29T13:51:44+5:302021-01-29T13:59:52+5:30
भविष्यात शिक्षण ऑफलाईन व्हावे अशी ६२ % पालकांची इच्छा, प्रजाच्या अहवालातील शिक्षण क्षेत्रातील निष्कर्ष
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात मुंबईतील ९७ % विद्यार्थी पालकांनी शिक्षणासाठी ऑनलाईन माध्यमांचा, पर्यायांचा वापर केला. मात्र भविष्यातील शिक्षणासाठी ऑफलाईन शिक्षणपद्धतीच योग्य ठरेल असे मत ६२ % मुंबईकर पालक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. यामधील ६० टक्के पालक हे खासगी शाळांतील आहेत, तर ६७ टक्के पालक हे सरकारी, पालिका, अनुदानित शाळांतील असल्याचे निरीक्षण प्रजाच्या अहवालात नोंदविण्यात आपले आहे. कोविड-१९ मुळे लॉकडाउनच्या काळात नागरिकांना कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला, मुंबईकरांच्या उपजीविका, शिक्षण, आरोग्य, घरे , परिवहन अशा विविध घटकांवर कसा व काय परिणाम झाला याचे कुटुंब आधारित सर्वेक्षण प्रजा फाउंडेशनमार्फत करण्यात आले आणि त्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे.
शैक्षणिक क्षेत्राचा विचार करताना सर्वेक्षणामध्ये खासगी व सरकारी दोन्हीही शाळांचा समावेश केला असून ऑनलाईन शैक्षणिक व्यासपीठ वापरण्यासाठी त्यांच्या शाळांनी आवश्यक ते प्रशिक्षण दिल्याचे दिसून आले. सरासरी ४३ टक्के पालक ऑनलाईन शिक्षणामुळे समाधानी असून त्यातील ४५% हे खासगी शाळांतील तर ३६ % पालक सरकारी शाळांतील आहेत. दरम्यान ७८% पालकांनी मुलांनी ऑनलाईन अभ्यासासाठी त्यांचा स्मार्टफोन वापरला असल्याचे नमूद केले आहे. कधी कधी मोबाईलमधील इंटरनेट डेटा संपल्याने ५६ % विद्यार्थ्यांनी पालकांशिवाय इतरांचे स्मार्टफोन ही वापरले आहेत, तर २७ % पालकांना एक्ट्रा डेटासाठी अधिक खर्च करावा लागला असल्याची माहिती सर्वेक्षणात नमूद केली आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसणे, डेटा पॅक संपणे, पालक घरी नसणे अशा कारणांमुळे १७ % विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात अनियमितता दिसून आली आहे.
इंटरनेटची समस्या
ऑनलाईन शिक्षणात ६४ % पालकांनी त्यांच्या मुलांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्या आल्याचे सांगितले, त्यामुळे भविष्यात ऑफलाईन शिक्षण पद्धतीच असावी असे मत ही त्यांनी मांडले आहे. ऑनलाईन शिक्षणात अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात ५५% मुलाना यश मिळाले तर १० % पालकाची आपल्या मुलांना ते जमलेच नसल्याचे मान्य केले. राज्यातील पाचवी ते आठवी व नववी ते बारावीच्या मुंबई वगळता इतर जिल्ह्यात शाळा सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील ५४% पालक आपल्या मुलांना आता शाळेत पाठविण्यास तयार असून यातील ५२ % पालक खासगी शाळांतील तर ६३ % पालक सरकारी शाळांतील आहेत. ४६ % पालकांनी अजूनही मुलांना शाळेत पाठविण्यास नकार दर्शविला आहे. जे पालक मुलांना शाळांमध्ये पाठविण्यास तयार आहेत त्यांच्यापैकी ३४ % पालकांनी मुलांना शाळेत चालत पाठ्वण्याच्या पर्यायाला जास्त पसंती दिली आहे. लहान असल्यास ४५ % पालकांनी घरातील सदस्य किंवा शेजारी मुलांना शाळेत सोडतील असे मत व्यक्त केले आहे. मात्र रेल्वेसेवा, रिक्षा , स्कुलबस यांनी मुलांना शाळांमध्ये पाठवण्यास तयार नसल्याचे म्हटले आहे.