मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरील नियुक्त्यांमध्ये घोळ; ‘मुक्ता’ची राज्यपालांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 06:03 AM2023-11-03T06:03:22+5:302023-11-03T06:04:54+5:30
पेपर सेटर, परीक्षकांच्या नियुक्त्याही नियमबाह्य
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन करत मुंबई विद्यापीठातील संपूर्ण अभ्यास मंडळांची नियमानुसार रचना न होताच पेपर सेटर, परीक्षक नेमले गेल्याची तक्रार मुक्ता या शिक्षक संघटनेने राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर मर्जीतील व्यक्तींना नियुक्त केले गेले आहे. त्यातील काही प्राध्यापकांना त्यांनी जो विषय कधी शिकवलाच नाही, त्या अभ्यास मंडळावर नियुक्त केल्याची गंभीर तक्रार मुक्ताने केली आहे.
या आधी प्र-कुलगुरू अजय भामरे यांच्या निवडीबाबतही मुक्ताने आक्षेप नोंदवला होता. नवीन शैक्षणिक धोरण राबवायचे असेल, अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार तयार करायचा असेल तर त्या संबंधित विषयातील तज्ज्ञ आणि विषयातील सखोल ज्ञान प्राध्यापकांना असणे गरजेचे आहे. अशाच प्राध्यापकांना अभ्यास मंडळावर घेतले जाते. परंतु, विद्यापीठात धक्कादायक प्रकार उघडकीस येत असल्याचे मुक्ताचे म्हणणे आहे.
‘मुक्ता’चे म्हणणे...
- नुकत्याच काही विषयांची अभ्यास मंडळांची रचना केली गेली. त्यात प्राध्यापकांना नियुक्त केले गेल्याचे पत्रही पाठविले गेले. परंतु, ही पत्रे पाहता ज्या प्राध्यापकांनी विषय शिकविलाच नाही
- अशा प्राध्यापकांना अभ्यास मंडळावर नियुक्त केले गेल्याचे मुक्ताचे म्हणणे आहे.
- बॅचलर ऑफ फायनानान्समधील किमान दोन नियुक्त्यांवर मुक्ताने थेट आक्षेप नोंदवला आहे. एका प्राध्यापकाच्या बाबत तर त्यांनी संबंधित हा विषय कधीच शिकविला नाही, असे लेखी पत्र त्यांच्या कॉलेजच्या प्राचार्यांनी विद्यापीठाला लिहिले आहे.
- कायद्याप्रमाणे पेपर सेटिंगसाठी परीक्षक अभ्यास मंडळातर्फे नेमले जातात. परंतु, काही अभ्यास मंडळांची रचना अद्याप व्हायची आहे. तरीदेखील सध्या कायद्याचे उल्लंघन करून पेपर सेटिंगसाठी परीक्षक नेमले गेले आहेत. त्यामुळे या सर्वच परीक्षा वैध आहेत की नाही या विषयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, असे मुक्ताचे सचिव प्रा. सुभाष आठवले यांनी सांगितले.