कथा, कादंबरी, दुर्मिळ ग्रंथाची गोडी लागण्यासाठी सोलापूर विद्यापीठाचा वेगळा उपक्रम; जाणून घ्या सविस्तर
By Appasaheb.patil | Published: October 15, 2022 06:08 PM2022-10-15T18:08:44+5:302022-10-15T18:09:13+5:30
60 हजार पुस्तके, जर्नल्स, ई-बुक उपलब्ध
सोलापूर : अभ्यासक्रमाबरोबरच विविध साहित्य, संस्कृती, थोर व्यक्तींच्या आत्मकथा, कादंबरी, दुर्मीळ ग्रंथ, दिवाळी अंक यासंदर्भात व्यापक पद्धतीने वाचनाची गोडी विद्यार्थ्यांना लागावी आणि वाचन संस्कृती वाढावी, या उद्देशाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
थोर शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणिक शाह, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करून ग्रंथ प्रदर्शनाबद्दल माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या ग्रंथ प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना विविध 60 हजार पुस्तके, 160 जर्नल्स, त्याचबरोबर 457 ई बुक, आणि 50 हजार हून अधिक ई-जर्नल्स विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध असणार आहेत. येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत हे ग्रंथ प्रदर्शन चालू असणार असल्याचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतर ज्ञान ग्रहण करण्यासाठी अवांतर वाचन करून जीवन समृद्ध बनण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन यावेळी प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार यांनी केले.