एकच विद्यार्थी, तरीही रोज भरते शाळा; शिक्षकही एकच, वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत रोज देतात धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 06:26 AM2023-01-24T06:26:45+5:302023-01-24T06:27:47+5:30
वाशिम जिल्ह्यातील गणेशपूर धानाेरा या गावातील जिल्हा परिषद शाळेत एकच विद्यार्थी शिक्षण घेत असून, एकच शिक्षक त्याला शिक्षणाचे धडे देतात.
प्रफुल बानगावकर
कारंजा (जि. वाशिम) :
वाशिम जिल्ह्यातील गणेशपूर धानाेरा या गावातील जिल्हा परिषद शाळेत एकच विद्यार्थी शिक्षण घेत असून, एकच शिक्षक त्याला शिक्षणाचे धडे देतात. कार्तिक बंडू शेगोकार असे विद्यार्थ्याचे नाव असून तो इयत्ता तिसरीत आहे. एक पटसंख्या असणारी ही बहुदा राज्यातील एकमेव शाळा असावी. या शाळेत वर्ग १ ते ५ असून, ४ वर्गखोल्या आहेत. पण विद्यार्थी एकच आणि शिक्षकही एकच आहे. तरीही ही शाळा सुरू असल्याने सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
गावात चार विद्यार्थी, त्यातील तीन बाहेर...
- गावात अवघी ३२ घरे असून, लोकसंख्या १५० एवढी आहे. गावात शिक्षण घेणारे एकूण चार विद्यार्थी आहेत. त्यापैकी तीन विद्यार्थी कांरजा येथे शिक्षण घेत आहेत. कार्तिक हा चौथा विद्यार्थी.
- यासंदर्भात शिक्षक किशोर मानकर म्हणाले, गावात विद्यार्थीच नाहीत. एक विद्यार्थी आहे. त्यालाच शिक्षणाचे धडे देत आहे.
- या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने ताे गावातीलच शाळेत शिक्षण घेत आहे.
त्या ठिकाणी आतापर्यंत दोन शिक्षक कार्यरत होते. मात्र पटसंख्या कमी झाली. त्यामुळे तालुकास्तरावर एका शिक्षकाची बदली करण्यात आली. आता एक विद्यार्थी एक शिक्षक कार्यरत आहे. नियमाप्रमाणे शाळा बंद करता येत नाही किवा विद्यार्थ्यांना स्थलांतरित करता येत नाही.
- श्रीकांत माने, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, कारंजा