Education: देशात महाराष्ट्रातील एक विद्यापीठ ठरले बोगस, सर्वाधिक बोगस विद्यापीठे नवी दिल्लीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 11:06 AM2022-08-28T11:06:10+5:302022-08-28T11:06:26+5:30
Education: विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली. त्यानुसार देशभरात २१ बोगस विद्यापीठे असून, सर्वाधिक बोगस विद्यापीठे राजधानी दिल्लीत आहेत.
मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली. त्यानुसार देशभरात २१ बोगस विद्यापीठे असून, सर्वाधिक बोगस विद्यापीठे राजधानी दिल्लीत आहेत. या यादीत राज्यातील एका विद्यापीठाचा समावेश असून हे विद्यापीठ नागपूर जिल्ह्यातील राजा अरेबिक विद्यापीठ आहे.
यूजीसीने देशातील बोगस २१ विद्यापीठांची यादी संकेतस्थळावर जाहीर केली आहे. गेल्या वर्षीच्या यादीमध्ये २४ बोगस विद्यापीठे होती. यूजीसीच्या नव्या यादीनुसार दिल्लीमध्ये आठ, उत्तर प्रदेशमधील चार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी दोन, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि पुदुच्चेरीमध्ये प्रत्येक एक बोगस विद्यापीठ असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
विद्यापीठ कायद्यानुसार स्थापन झालेल्या केंद्रीय, राज्य आणि अभिमत विद्यापीठांना किंवा संसदेने पारित केलेल्या कायद्यानुसार संस्थांनाच पदवी प्रदान करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अन्य संस्थांना नावात विद्यापीठ हा शब्द वापरता येत नाही. संबंधित २१ संस्था विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन करत असल्याने त्यांना बोगस ठरवण्यात आले आहे, त्यांना पदवी प्रदान करण्याचा अधिकार नसल्याचे यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी स्पष्ट केले.