इंग्रजीपाठोपाठ आता १२ वीच्या हिंदीच्या प्रश्नपत्रिकेतही घोळ; मार्क देणार कसं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 09:19 AM2023-02-23T09:19:55+5:302023-02-23T09:20:28+5:30
राज्य शिक्षण मंडळाकडून यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते.
मुंबई - इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नाची उत्तरेच छापून आल्याचा प्रकार ताजा असतानाच, बारावी परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी हिंदीच्या प्रश्नपत्रिकेतही घोळ झाल्याचे उघडकीस आले.
राज्य शिक्षण मंडळाकडून यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. मंडळाने किमान या प्रश्नांचे गुणदान कसे करणार, याची माहिती द्यावी, अशी मागणी पालक करीत आहेत. दरम्यान, हिंदी विषयाच्या परीक्षेत राज्यात आठ गैरप्रकार समोर आले आहेत.
हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक दोनमध्ये चार शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे होते. मात्र, या शब्दांचे क्रमांक १,२,१,२ असे देण्यात आले. ते १,२,३,४ असे असायला हवे होते. तर चार समानार्थी शब्द लिहिण्यासाठी दिलेल्या चारही शब्दांना १,१,१,१ असे क्रमांक देण्यात आले आहेत. हे १,२,३,४ असे असायला हवे होते. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न क्रमांक लिहून उत्तरे लिहिणे अपेक्षित असताना, प्रश्न क्रमांकातच घोळ झाल्यावर गुणदान कशाचे आणि कसे होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.