All The Best! आजपासून बारावीची परीक्षा; मुंबईत ३ लाखांहून अधिक विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 08:31 AM2023-02-21T08:31:02+5:302023-02-21T08:31:22+5:30
मुंबई विभागीय मंडळाच्या अंतर्गत असलेल्या परीक्षा केंद्रांवर बारावी परीक्षेची आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली.
मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. यंदा मुंबई विभागातून ३ लाख ४४ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. मुंबईतील ६३५ केंद्रांवर परीक्षा पार पडणार असून, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. मंडळाने यंदा कॉपीमुक्त अभियानात अनेक प्रकारच्या उपाययोजना नव्याने केल्या आहेत.
मुंबई विभागीय मंडळाच्या अंतर्गत असलेल्या परीक्षा केंद्रांवर बारावी परीक्षेची आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण येऊ नये म्हणून मंडळाकडून प्रत्येक विभागीय मंडळामध्ये समुपदेशन आणि हेल्पलाइनची सोय उपलब्ध करून दिल्याचेही बोरसे यांनी सांगितले. मुंबईतील परीक्षकांची संख्या ६७ आहे. शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, म्हणून सोमवारपर्यंत अर्ज स्वीकारल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सगळी काळजी शाळा व्यवस्थापनाकडून घेतली जाईल. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात. परीक्षा काळातही समुपदेशन उपलब्ध राहणार असल्याने काही अडचणी, समस्या आल्यास विद्यार्थ्यांनी त्यावर संपर्क साधावा. याशिवाय मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या अतिरिक्त दहा मिनिटांच्या सुविधेचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा. - सुभाष बोरसे, सचिव, मुंबई विभागीय मंडळ