सीबीएसई बारावीचे मूल्यांकन दहावी, अकरावीसह पूर्वपरीक्षेतील कामगिरीआधारे; समितीच्या बैठकीत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 05:06 AM2021-06-15T05:06:04+5:302021-06-15T05:06:17+5:30
शिक्षण मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मूल्यमापन करताना प्रत्येक घटकाला किती महत्त्व द्यायचे, याबाबत मतभेद समोर आले. परंतु या निकषाबाबत अंतिम निर्णय सीबीएसई बोर्ड घेणार आहे. १
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सीबीएसई १२ वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन १० वी आणि ११ वीमध्ये वार्षिक परीक्षेत मिळालेले गुण आणि १२ वीच्या पूर्वपरीक्षेतील त्यांच्या कामगिरीआधारे केले जाण्याची शक्यता आहे. मूल्यमापनाचे निकष ठरवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि सीबीएसई बोर्डाने गठित केलेल्या १२ तज्ज्ञांची समिती यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे.
शिक्षण मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मूल्यमापन करताना प्रत्येक घटकाला किती महत्त्व द्यायचे, याबाबत मतभेद समोर आले. परंतु या निकषाबाबत अंतिम निर्णय सीबीएसई बोर्ड घेणार आहे. १ जूनरोजी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका लक्षात घेता ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ही परीक्षा घेण्याची तयारी दर्शविली होती, परंतु महाराष्ट्रासह दिल्ली, गोवा आदी राज्यांनी प्रत्यक्ष परीक्षा घेण्यास विरोध दर्शविला होता. सुप्रीम कोर्टानेही बोर्डाला मूल्यांकनाचे निकष ठरवण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती.
विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ प्रतिबिंब १० वीच्या निकालातून दिसून येत असल्याने १२ वीचे मूल्यांकन करताना याचा आधार घेतला जावा, असे समितीच्या सदस्यांचे मत होते, तर बारावीच्या पूर्वपरीक्षेसाठी पुरेशी तयारी न करू शकलेल्यांच्याबाबतीत ११ वीच्या निकालाचा आधार घेतला जावा, अशी चर्चा या बैठकीत झाली. तसेच १२ वीचे मूल्यांकन करावयाचे असल्याने याच्या पूर्वपरीक्षेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा विचार केलाच गेला पाहिजे, अशी चर्चा या बैठकीत झाल्याचे शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.