मूल्यमापन ऑनलाइन करायचे की ऑफलाइन? पालक संभ्रमात, मुख्याध्यापकांसह शिक्षकांचीही त्रेधातिरपीट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 09:08 AM2021-10-15T09:08:20+5:302021-10-15T09:08:24+5:30
Crime News: शाळा सुरू झाल्या, ५० टक्के उपस्थितीने विद्यार्थीही हळूहळू उपस्थित होत आहेत. मात्र पुढे काय? मूल्यमापन कसे करायचे? ऑनलाइन की ऑफलाइन, या संदर्भात शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक संभ्रमात पडले आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शाळा सुरू झाल्या, ५० टक्के उपस्थितीने विद्यार्थीही हळूहळू उपस्थित होत आहेत. मात्र पुढे काय? मूल्यमापन कसे करायचे? ऑनलाइन की ऑफलाइन, या संदर्भात शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक संभ्रमात पडले आहेत.
संमिश्र पद्धतीच्या मूल्यमापनासाठी शिक्षकांना एकच पद्धत दोन किंवा त्याहून अधिक वेळा वापरावी लागणार आहे. यामध्ये वेळेचा अपव्यय तर होत आहेच, मात्र अनेक अडचणीही येत असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षक देत आहेत. सरकारने शाळा सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचनांसोबत परीक्षा व मूल्यमापनासाठीही मार्गदर्शक सूचना देणे आवश्यक होते, असे मत पालक, शिक्षक, मुख्याध्यापक करीत आहेत. यासंदर्भात शिक्षण विभागाकडून मूल्यमापनासाठी एकसमान मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी मागणी करणार असल्याची भूमिका मुख्याध्यापक संघाकडून घेण्यात येऊन त्यासंबंधी लवकरच ते पत्र देणार असल्याची माहिती मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव पांडुरंग केंगार यांनी दिली आहे.
दीड वर्षाहून अधिक काळानंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे. या काळात ऑनलाइन शिकवलेल्या अभ्यासक्रमाचे मूल्यमापन झाले, तरच पुढील अभ्यासक्रम कसा आणि किती वेळ घ्यावा, याचे नियोजन शिक्षकांना आणि पर्यायाने शाळा व्यवस्थापनाला करावे लागणार आहे. अनेक विद्यार्थी ऑनलाइन होते, मात्र त्यांना प्रत्यक्षात संकल्पना कळल्याच नसल्याचे आता शिक्षकांना लक्षात येत आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या लेखनवाचनाचा मूलभूत पायाच ऑनलाइन शिक्षणात सरावाअभावी कच्चा राहिला, ते तसेच पुढील वर्गात गेले. त्यामुळे आता प्रत्यक्षात त्यावरील परीक्षा देणे विद्यार्थ्यांना कठीण होणार असल्याची माहिती शिक्षक देत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणादरम्यान दिलेला गृहपाठ, सराव चाचण्या, सेतू अभ्यासक्रमाच्या चाचण्यांपैकी किती स्वतःहून आणि प्रत्यक्षात सोडविल्या यावर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याचे ते सांगत आहेत. ऑनलाइन वर्गात तर विद्यार्थी उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह होतेच. त्यामुळे दिवाळीआधी होणाऱ्या परीक्षांत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आवश्यकच आहे. त्यानुसार त्यांच्या पुढील अभ्यासक्रमाची दिशा ठरवणे सोपे झाले असते, असे केंगार यांनी सांगितले. मात्र, शिक्षण विभागाच्या मूल्यमापनासंदर्भात काहीच मार्गदर्शक सूचना नसल्याने प्रत्येक शाळा आणि त्यांचे व्यवस्थापन त्यांच्या सोयीनुसार व नियोजनाप्रमाणे परीक्षा घेत असल्याने गोंधळ उडाला आहे. यामुळे शिक्षण विभागाकडून मूल्यमापनासाठी काहीतरी सूचना आवश्यक आहेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
परीक्षा व्हायलाच हव्यात, अडचणी काय?
-अद्याप अनेक विद्यार्थी हे ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे ऑफलाइन येणारे आणि ऑनलाइन विद्यार्थी यांच्या परीक्षांचे वेगवेगळे नियोजन करावे लागणार.
-परीक्षांच्या दोन्ही पद्धती वेगळ्या
असल्याने निकालात समानता आणि पारदर्शकता राखणे कठीण होत आहे.
-विविध शाळांतील विविध परीक्षा पद्धतींनी पालक संभ्रमात आहेत आणि इतर विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन धोरणाशी तुलना होत आहे.
-शिक्षक आणि मुख्याध्यापकही मूल्यमापन पद्धतीमुळे हैराण झाले असून मार्गदर्शनासाठी सातत्याने विचारणा करीत असल्याचे दिसून येत आहे.
-सातत्यपूर्ण अध्ययन प्रक्रियेत शाळांनी ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने शाळास्तरावर नियोजन करावे, अशा सूचना आहेत. मात्र, त्यात सुसूत्रता नसल्याने हा गोंधळ उडाल्याचे मुख्याध्यापक सांगत आहेत.