वय वाढलं पण जिद्द कमी नाही झाली; वयाच्या ४७ वर्षी दहावीची परीक्षा पास केली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 07:04 PM2022-06-17T19:04:09+5:302022-06-17T19:04:50+5:30
मनीषा राणे यांनी १९९३ साली ८ वी ची परीक्षा दिली. त्यानंतर मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांचे शिक्षण थांबले.
ठाणे - आज दहावीचा निकाल लागला. अनेक मुले पास झाले आणि आनंदीत झाले. मात्र डोंबिवलीमधील एका महिलेने वयाच्या ४७ व्या वर्षी परीक्षा दिली आणि त्या उत्तीर्ण झाल्या आहेत. मनीषा राणे असं या महिलेचे नाव असून डोंबिवली त्या सामाजिक काम करतात. तसेच त्या भाजपा कल्याण ग्रामीणच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून सुद्धा काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मेहनतीने आणि चिकाटीचे कौतुक केले जात आहे.
मनीषा राणे यांनी १९९३ साली ८ वी ची परीक्षा दिली. त्यानंतर मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांचे शिक्षण थांबले. १९९५ साली त्यांचं लग्न झाल्यानंतर त्या मुंबईला आल्या. सासरची परिस्थिती देखील जेमतेम असल्याने त्या जेवण बनविणे, धुणी भांडी अशी कामे केली. गणेशनगर मधील महिलांच्या साथीने त्यांनी फंडचा व्यवसाय सुरू केला आणि त्यांची परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. यादरम्यान एका व्यक्तीने मनीषा यांना तुम्ही काय शिकणार असे बोल लगावल्याने मनीषा यांनी आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला.
जुनी ८ वी पास असल्याने त्यांना पदवीची परीक्षा देता आली. त्यानुसार २०२१ मध्ये त्यांनी सोशल सायन्स या विषयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. मात्र १० वी व १२ वी बोर्डाची परीक्षा राहिल्याने मनीषा यांही या परीक्षा देण्याचे ठरविले. कामातून जसा वेळ मिळेल तसा अभ्यास करत केला व परीक्षेत बसले. परीक्षेत त्यांना भूमिती, बीजगणित या विषयाचे पेपर कठीण गेले होते, त्यामुळे त्याची थोडी धाकधूक होती की विषय सुटतो की नाही. परंतु त्या चांगल्या मार्काने पास झाल्याने त्यांना अभिमान वाटू लागला असून मला माझे शिक्षण पूर्ण करायचे आहे आणि ते मी करणारच असा विश्वास व्यक्त करत १२ वी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लॉ चे शिक्षण घ्यायचे असल्याचे मनिषा राणे यांनी सांगितले.