परदेशी शिक्षण संस्थांत प्रवेश घेताना जरा जपून; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 09:13 AM2022-02-19T09:13:51+5:302022-02-19T09:14:22+5:30
पडताळणी करण्याच्या वैद्यकीय आयोगाच्या सूचना
मुंबई : किर्गिझस्तान किंवा अन्य इतर देशांच्या विद्यापीठांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेताना तेथील शिक्षण संस्थांमधील पायाभूत सुविधांची आणि शैक्षणिक अभ्यासक्रमाची माहिती घेऊनच भारतीय विद्यार्थ्यांनी तेथे प्रवेश घ्यावे, असे आवाहन राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने केले आहे. याशिवाय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या परदेशांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या परीक्षांसाठीच्या मार्गदर्शक सूचना ही प्रवेशाआधी जाणून घ्याव्यात, असे स्पष्ट केले आहे.
मागील एका वर्षात किर्गिझस्तान या देशांत एव्हीसीयाना विद्यापीठ, अदाम विद्यापीठ, मेट्रो विद्यापीठ आणि इतर अनेक वैद्यकीय विद्यापीठे आणि शिक्षण संस्था स्थापन झाल्या असून भारतीय विद्यार्थ्यांचा तेथील प्रवेशासाठीचा ओढा वाढला असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. दरम्यान एकाही किर्गिझस्तान विद्यार्थ्याने प्रवेश न घेतलेल्या या शिक्षणसंस्थामध्ये आतापर्यंत २०० भारतीय विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर या देशांत किंवा अन्य देशांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यातही पायाभूत सुविधा, अभ्यासक्रम मान्यता अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या सचिवानी पत्रकाद्वारे दिला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षणासाठी संस्था निवडताना काळजी घ्यावी असा सल्ला त्यांनी या पत्रकाद्वारे विद्यार्थ्यांना दिला आहे.
चीनमधील ऑनलाइन अभ्यासक्रमावर बंदी
या आधी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाद्वारे चीनमधील शिक्षण संस्थांमधून सद्य:स्थितीत ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या अभ्यासक्रमांना भारतात मान्यता नसेल असे स्पष्ट केले आहे. मात्र, उपलब्ध माहितीनुसार जवळपास २१ हजार विद्यार्थ्यांनी चीनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतले असून या निर्णयामुळे अनेकांचे नुकसान होईल, असे मत व्यक्त होत आहे.