१२ वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मोठी चूक; विद्यार्थ्यांना ६ मार्क फुकटात मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 06:04 AM2023-02-22T06:04:31+5:302023-02-22T06:04:47+5:30
इंग्रजीच्या पेपरात प्रश्नांऐवजी उत्तरे! ८० गुणांच्या इंग्रजीच्या कृतिपत्रिकेत प्रश्न क्रमांक ३ मध्ये कवितेवर आधारित १४ गुणांचे प्रश्न विचारले जातात.
मुंबई - बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा गोंधळ समोर आला असून, इंग्रजीच्या पेपरमधील तीन प्रश्नांमध्ये चक्क उत्तरच (मॉडेल ॲन्सर) छापून आल्याने बोर्डाच्या कामकाजाची लक्तरे पुन्हा वेशीवर टांगली गेली.
प्रश्नपत्रिकेतील त्रुटीबाबत संयुक्त सभेच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या चुकांचे सहा गुण परीक्षार्थीला मिळण्याची शक्यता आहे.
झाले काय?
८० गुणांच्या इंग्रजीच्या कृतिपत्रिकेत प्रश्न क्रमांक ३ मध्ये कवितेवर आधारित १४ गुणांचे प्रश्न विचारले जातात. मात्र प्रश्नपत्रिकेत ए-३, ए-४, ए-५ या तीन कृतींमध्ये दोन प्रश्न छापण्यात आलेले नाहीत, तर प्रश्नाऐवजी उत्तर छापण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले.
मंडळाने तयार केलेल्या नमुना उत्तरपत्रिकेतील ए-३, ए-४, ए-५ ही उत्तरे सूचानांसह जशीच्या तशीच कृतिपत्रिकेत छापून आली आहेत.
१७ ठिकाणी गैरप्रकार उघडकीस
पहिल्याच दिवशी राज्यात १७ गैरप्रकार उघडकीस आले असून, सर्वाधिक सात प्रकरणे पुण्यातील असल्याचे राज्य शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले. नागपूर, औरंगाबाद येथे प्रत्येकी तीन, तर नाशिक विभागीय मंडळात दोन गैरप्रकार घडले. अमरावती आणि लातूर विभागीय मंडळात प्रत्येकी एक, गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले.
पेपर व्हॉट्सॲपवर : वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे २२ मिनिटांतच इंग्रजीच्या पेपरची १२ ते १५ छायाचित्रे मोबाइलवर व्हायरल झाली. यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन (ता. झरी) येथील महाविद्यालयातील केंद्रावरूनही पेपर व्हायरल झाला असून पोलिसांनी केंद्रप्रमुखासह तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले.