मुंबईत मराठी शाळांची पाटी कोरीच..! आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 09:09 AM2022-08-15T09:09:07+5:302022-08-15T09:09:31+5:30
Education : मुंबईत विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवीन दालने उघडली असली तरी मराठी शाळा, सरकारी अनुदानित शाळा मात्र खासगीकरणाच्या लाटेत ओस पडू लागल्या आहेत. विशेषत: मराठी शाळांची पाटी कोरीच असल्याचे चित्र आहे.
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हटल्यावर मुंबईतशिक्षणसंस्था, महाविद्यालय आणि विविध माध्यमांच्या शाळा ओघानेच येणे क्रमप्राप्त आहे. पुणे शिक्षणासाठी पहिली पसंती असली तरी पुण्यानंतर गुणवंतांची पसंती शालेय शिक्षणासाठी असो किंवा वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि विविध शाखांतील कुठल्याही अभ्यासक्रमासाठी असो ती मुंबईतील शिक्षण संस्थांनाच असते, यात वाद नाही. मात्र, मुंबईत विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवीन दालने उघडली असली तरी मराठी शाळा, सरकारी अनुदानित शाळा मात्र खासगीकरणाच्या लाटेत ओस पडू लागल्या आहेत. विशेषत: मराठी शाळांची पाटी कोरीच असल्याचे चित्र आहे.
राज्यात ३० ते ४० हजार एक शिक्षकी शाळा असून, त्यातील अनेक मुंबई विभागात ही आहेत. मुंबई नुकत्याच झालेल्या मिशन झिरो ड्रॉप आउट मोहिमेमधून तब्बल २ हजार ७०० हून अधिक शाळाबाह्य मुलांना शोधून शाळांमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही मोहीम आणखी काही दिवस चालू ठेवल्यास आणि व्याप्ती वाढविल्यास मुंबईतील शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाचे विदारक चित्र समोर येईल, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते देत आहेत. तसेच शिक्षणाचा दर्जा आणि पातळी याचे निरीक्षण करण्यासाठी जबाबदार यंत्रणा मात्र अस्तित्वात नसल्याची खंत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल
विद्यार्थी दहावी, बारावीनंतर आयटीआयचे कोर्स करतात आणि व्यवसाय सुरू करतात. मुंबई विभागातील ७ जिल्ह्यात ६७ शासकीय आयटीआय असून यात ४९ सर्वसाधारण आयटीआय महिलांकरिता ३ आयटीआय, १० आदिवासी आयटीआय, २ अल्पसंख्याक आयटीआय तसेच ३ आदिवासी आश्रमशाळा आहेत. याशिवाय मुंबई विभागात ३९ खासगी आयटीआय आहेत. याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व संचलनालयाने दिली.
पालिका शाळांमधील ओढा
मुंबई पालिका शिक्षण विभागाने यंदा विद्यार्थी संख्या वाढविण्याच्या निश्चय केला मात्र हा प्रयत्न मागील अनेक वर्षांपासून झाला असता तर विद्यार्थी गळती आणि मराठी शाळांची घटती संख्या दोन्ही थांबविता आले असते, असे मत तज्ज्ञ
व्यक्त करतात.
पॉलिटेक्निक जोरात
मुंबईत १६ पॉलिटेक्निक महाविद्यालये असून, त्यांची प्रवेशक्षमता ५ हजार १३४ असून, त्यासाठी यंदा ६ हजार ९ अर्ज आले आहेत. पॉलिटेक्निक प्रशिक्षणानंतर मिळणाऱ्या रोजगाराच्या संधीमुळे विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे आकर्षित होत आहेत.
इंग्रजी शाळा दुप्पट
यू डायस २०२०-२१ च्या माहितीनुसार शहरात उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिकच्या एकूण १ हजार १३० आहे. तिथेच मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या केवळ ३७० आहे. शिवाय मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, उर्दू अशा सर्व माध्यमांच्या शाळांची संख्या केवळ ६६४ आहे. एकूणच इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या ही या इतर माध्यमांच्या शाळांपेक्षा दुप्पट आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रस्थ यावरून अधोरेखित होते. ही अतिशय
गंभीर बाब आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात?
स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशाच्या प्रगतीचे महत्त्वाचे मुद्दे विचारात घेतल्यास शिक्षण आरोग्य आणि सार्वजनिक सुविधा अत्यंत महत्त्वाचे असून, मुंबई हे शिक्षणाच्या दृष्टीनेदेखील आकर्षणाचे केंद्र होऊ लागले आहे. आयआयटीसाठी तर ते प्रसिद्ध आहेच, शिवाय मुंबई विद्यापीठदेखील नावाजलेले आहे. बहुभाषिक संस्कृती असल्याने सर्वच भाषेतील लोकांना सामावून घेणारे शिक्षण हे मुंबईचे वैशिष्ट्य मानावे लागेल; पण दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या मराठी शाळा हा मात्र लक्षवेधी विषय आहे.
- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ