पर्सेटाईल गुणांत मुलांनी मारली बाजी; आवडत्या महाविद्यालयातील प्रवेशाचा मार्ग सुकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 08:03 AM2020-12-01T08:03:40+5:302020-12-01T08:03:54+5:30
मागील वर्षी ती १७५ होती. ९९ पर्सेटाईल मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १६० आहे,
मुंबई : राज्य सीईटी सेलकडून शनीवारी रात्री, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवीच्या सीईटीचा निकाल जाहीर केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली असली तरी रँकिंगवर त्याचा परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेशाचा मार्ग सुकर असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. १०० पर्सेटाईल मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा ४१ असून ९९.९९ पर्सेटाईल मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १८५ आहे,
मागील वर्षी ती १७५ होती. ९९ पर्सेटाईल मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १६० आहे, मागील वर्षी ती १५० होती.यंदा नोंदणी ५ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी केली असली तरी प्रत्यक्षात परीक्षेला मात्र ३ लाख ७६ हजार ६०४ विद्यार्थी बसले होते. एकूणच यंदाची विद्यार्थ्यांची परीक्षेची अनुपस्थिती २८.७३% इतकी होती जी मागील २ वर्षांपेक्षा खूपच जास्त होती. मात्र तरीही विद्यार्थ्यांनी कोरोना काळात विद्यार्थ्यांनी संयम ठेवून दिलेल्या परिक्षेमुळे ४१ विद्यार्थी १०० पर्सेटाईल मिळवू शकल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
प्रवेशप्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी
सीईटी सेलकडून अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी या महत्त्वाच्या सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता यांची प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणीही विद्यार्थी पालकांकडून होत आहे.
चुकीच्या प्रश्नांचे २३ गुण
सीईटी सेलकडून प्रश्नपत्रिकात झालेल्या चुकांमुळे विविध सत्रामधील विद्यार्थ्यांना २३ गुण बहाल करावे लागले आहेत. अशा प्रकारच्या सदोष प्रश्नपत्रिका आणि त्यामुळे द्यावे लागणारे अतिरिक्त गुण विद्यार्थ्यांमधील निकोप स्पर्धेला धक्का लागण्याची शक्यता असल्याने सेलकडून याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.