शाळा उघडण्याच्या तयारीला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 05:59 PM2020-11-23T17:59:29+5:302020-11-23T18:04:59+5:30

शासनाच्या निर्देशानुसार सोमवारपासून इयत्ता नववी ते १२वीचे वर्ग भरणार होते. मात्र शाळा उघडण्याचा निर्णय ७ डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडला आहे.

'Break' in preparation for school opening | शाळा उघडण्याच्या तयारीला ‘ब्रेक’

शाळा उघडण्याच्या तयारीला ‘ब्रेक’

Next
ठळक मुद्देचाळीसगावला ७७ शाळांची तयारी पूर्ण : प्रशासनाच्या निर्णयामुळे शाळा उघडणार ७नंतरपातोंडा येथे तपासणी केलेले तीन शिक्षक बाधित

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : शासनाच्या निर्देशानुसार सोमवारपासून इयत्ता नववी ते १२वीचे वर्ग भरणार होते. मात्र शाळा उघडण्याचा निर्णय ७ डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडल्याने आता या तयारीलाच ब्रेक लागला आहे. मार्च महिन्यात कोरोना संसर्गाचा धोका ओळखून जाहीर झालेल्या टाळेबंदीत शाळांमधील किलबिलाटही थांबली. गत आठ महिन्यांपासून शाळांनादेखील टाळे आहे. मात्र शासनाने दिलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे दरवाजे सोमवारी उघडणार होत्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने आता ७ डिसेंबरपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने या तयारीला ब्रेक लागला आहे. शाळांनी केलेल्या नियोजनानुसार, ठी पटसंख्या असणाऱ्या शाळा सकाळ व दुपार सत्रात भरविल्या जाणार होत्या. कमी पटसंख्येच्या एकाच सत्रात भरणार होत्या. विद्यार्थी संख्येनुसार सुरक्षित शारिरिक अंतर ठेऊन बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

 

काय होते शाळांचे नियोजन?

१. शाळांनी इयत्तानिहाय विद्यार्थ्यांना शाळेत बोलविण्याचे नियोजन केले.

२. विद्यार्थ्यांची प्रवेशव्दारावरच थर्मल स्कॕनिंग केले जाणार होते.  हात धुणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर, बैठक व्यवस्थेबाबत सुचना देण्यात आल्या होत्या.

३. पालकांचे संमतीपत्रकही आवश्यक असणार आहे.

४. कोरोना चाचणी झालेल्या शिक्षक - प्राध्यापकांना सोमवारी प्रथम बोलविण्यात आले होते. दोन तास अध्यापन केले जाणार होते.

 

जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सात डिसेंबर पर्यंत शाळा, आश्रमशाळा व वसतिगृहे बंदच राहणार आहे. वरिष्ठांच्या सुचनेनुसार पुढील सुचना देण्यात येतील. दरम्यान ७७ शाळांचे निर्जंतुकीरण पूर्ण झाले आहे. - विलास भोई प्र. गटशिक्षणाधिकारी, चाळीसगाव.

 

शाळा सुरु होतील, त्यावेळी पालकांचे संमतीपत्र असल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. -डॅनिअल दाखले, मुख्याध्यापक, गुडशेफर्ड विद्यालय, चाळीसगाव.

 

पातोंडा येथे तपासणी केलेले तीन शिक्षक बाधित

चाळीसगाव तालुक्यातील इयत्ता नववी ते १२वीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या एकूण ०१ हजार ७८ शिक्षक-प्राध्यापकांसह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपैकी शहरात ४५४ तर ग्रामीण भागात ४४६ अशा ९०० कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या आहे. पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी केलेल्या तीन शिक्षक बाधित असल्याचे आढळून आले आहे. उर्वरीत १७८ शिक्षकांच्या चाचण्या सोमवारी पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

विद्यार्थी-पालकांमधील संभ्रम संपता संपेना

सोमवारचा दिवस उजाडायला आला तरीही जळगावातील शाळांबाबत कोणत्याही अधिकृत सुचना नव्हत्या. त्याचबरोबर, सध्या कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढू लागल्याने मुलांना शाळेत पाठवावयाचे की नाही, त्याचबरोबर कोणती काळजी घ्यावयाची. मुलांना घरून अभ्यास करण्याची मुभा आहे की नाही, असे अनेक प्रश्न पालकांच्या मनात घोळत होते. विद्यार्थीही गेले दोन दिवस संभ्रमातच आहेत. वार्षिक परिक्षा कोणत्या अभ्यासक्रमावर आधारित असेल इथपासून ते अगदी परिक्षेचे स्वरुप काय असेल, कोणते विषय शाळांमध्ये शिकवले जाणार, या सर्व शंकांना उत्तरे मिळत नव्हती.

Web Title: 'Break' in preparation for school opening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.