CA परीक्षेचा निकाल जाहीर; मुंबईचा मित शाह देशात ठरला अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 13:53 IST2022-07-15T13:51:23+5:302022-07-15T13:53:18+5:30
सनदी लेखपाल अर्थात सीएच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत मुंबईच्या मित शाहने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

CA परीक्षेचा निकाल जाहीर; मुंबईचा मित शाह देशात ठरला अव्वल
मुंबई: नुकताच सनदी लेखपाल (Chartered Accountant)अर्थात सीएच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. १४ ते २९ मे २०२२ या कालावधीत सीएची अंतिम परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची केंद्रे देशातील विविध भागांमध्ये होती. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना निकालाची मोठी प्रतीक्षा होती आणि अखेर निकाल लागला. ही परीक्षा दोन टप्प्यांत पार पडली होती. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल पाहू शकतात. या परीक्षेत मुंबईच्या मित शाहने पहिला क्रमांक पटकावला तर जयपूरच्या अक्षत गोयलला दुसरा क्रमांक मिळवण्यात यश आले.
दोन्ही ग्रुपचा निकाल खालीलप्रमाणे
ग्रुप -१ निकाल - २१.९९ टक्के
ग्रुप -२ निकाल - २१.९४ टक्के
असा पाहा निकाल
निकाल पाहण्यासाठी ICAI CA निकाल २०२२ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. icai.nic.in, caresults.icai.org आणि icaiexam.icai.org या दोन्हीही वेबसाइटवर जाऊन तुम्ही सहज निकाल पाहू शकता. निकाल पाहण्यासाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना त्यांचा आसन क्रमांक, त्यांचा नोंदणी क्रमांक अथवा पिन वापरून लॉर इन करणे बंधनकारक आहे.
मुंबईचा मित शाह देशात ठरला अव्वल
सीएच्या निकालामध्ये मुंबईच्या मित अनिल शाहने बाजी मारून पहिला क्रमांक पटकावला. त्याने ८०० पैकी ६४२ गुण मिळवून ८०.२५% मिळवले आहेत. तर ७९.८८% मिळवून जयपूरच्या अक्षत गोयलने देशात दुसरा क्रमांक पटकावला आणि ७६.३८% गुणांसह सुरतमधील सृष्टी केयुरभाई संघवी हिने देशात तिसरा क्रमांक पटकावला. या परीक्षेसाठी बसलेल्या पहिल्या ग्रुपमधील ६६,५७५ विद्यार्थ्यांपैकी १४,६४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दुसऱ्या ग्रुपमधील २९,३४८ विद्यार्थ्यांपैकी ३,६९५ विद्यार्थी पास झाले आहेत.