Poll: सीईटीचं करायचं काय?... परीक्षा घ्यावी की कायमची रद्द करावी?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 12:03 PM2020-08-17T12:03:59+5:302020-08-17T13:44:53+5:30
सध्याची परिस्थिती पाहता आणि सीईटीची एकंदरीत उपयुक्तता लक्षात घेऊन ही परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
महाराष्ट्रात अभियांत्रिकी, फार्मसी, इ. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा (सीईटी) २००५ च्या सुमारास सुरू झाली. त्यानंतर कधी फक्त CET तर कधी CET +१२ वी, कधी JEE असे धक्के विद्यार्थ्यांना देत हा प्रवेशाचा कार्यक्रम सुरु राहिला. गेल्या काही वर्षात या परीक्षेचे स्वरूप बदलत गेले आणि आज ती एक कठीण परीक्षा म्हणून गर्वाने (अनावश्यक) घेतली जाते. या परीक्षेमुळे बारावी परीक्षेचे महत्त्व संपुष्टात आले. सर्व विद्यार्थी बारावीकडे दुर्लक्ष करून सीईटीचा अभ्यास करू लागले. त्यासाठी कोचिंग क्लासेससाठी पालकांना भरमसाठ भुर्दंड सोसणे जिकिरीचे झाले. मात्र गंमत अशी की परीक्षा जरी कठीण असली तरी एक गुण मिळाला तरीही विद्यार्थ्याला प्रवेशासाठी पात्र घोषित केले गेले.
याच कालावधीत अभियांत्रिकी-फार्मसी इत्यादी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या जागांचे प्रमाणही वाढत गेले. त्यामुळे या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणारी चढाओढ बऱ्याच प्रमाणात संपुष्टात आली. आता तर बऱ्याच संस्थांमध्ये जागा रिकाम्या राहू लागल्या. अशा परिस्थितीत, जरी विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षा मंडळांच्या परीक्षा देत असले तरीही सीईटी परीक्षा खरेतर अनावश्यक गोष्ट वाटू लागली.
लहान मोठ्या शहरातील, साध्या घरातील विद्यार्थ्याला सीईटी परीक्षा म्हणजे नक्कीच आर्थिक व मानसिक भुर्दंड आहे. आपल्याच गावातील संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्याला सीईटीचा मोठा व अवाजवी वळसा घ्यावा लागत आहे. यामुळे काही विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी-फार्मसी प्रवेशाचा मनसुबा बदलून अन्य अभ्यासक्रमांसाठी पसंती दर्शवली असे दिसून आले आहे.
यावर्षी कोरोनामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. COVID-19 पालक विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. यामुळे सद्यपरिस्थितीत ही परीक्षा घेणे एक कठीण बाब झाली आहे. देशातील सगळ्याच राज्यात COVID-19 मुळे परीक्षेबद्दल संपूर्ण अनिश्चितता आहे. परीक्षेला फार उशीर झाल्याने व परीक्षेच्या अनिश्चितीमुळे मुलांची अभ्यासाची इच्छाशक्तीही संपुष्टात आली आहे. घरात, आजूबाजूला जाणिवणारी COVID भीती वातावरणात भिनली आहे. परीक्षेसाठी आवश्यक शांत व उत्साहवर्धक वातावरण आज नाही. त्यामुळे पंजाब विद्यापीठाने सीईटी परीक्षा रद्द करून बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
सीईटी परीक्षेमुळे अभियांत्रिकी-फार्मसी इत्यादी अभ्यासात काही उपयोग होतो का याचा आढावा कोणी घेतल्याचे अजून तरी दिसून आलेले नाही. त्यामुळे या परीक्षेचा एवढा मोठा अट्टाहास करण्याची गरज काय हे समजण्यापलीकडचे आहे.
ही परीक्षा खरेतर फक्त विद्यार्थ्यांचा गुणानुक्रम ठरवण्यासाठी घेतली जाते. बाकी या परीक्षेचा काहीही उपयोग नाही. गुणानुक्रम ठरवण्यासाठी बारावी परीक्षेचे गुण नक्कीच पुरेसे आहेत. सीईटी परीक्षा सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांचे प्रवेश हे बारावी परीक्षेच्या गुणांवरच (PCM/PCB) केले जात असत. थोडं मन मोठं करून आपण विचार केला तर आपल्याला असे लक्षात येईल की तेव्हा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सुद्धा उत्तमरित्या कार्यरत आहेत. त्यामुळे सीईटी परीक्षा ही एक निव्वळ प्रशासनिक बाब आहे आणि या परीक्षेचा अभ्यासाच्या दृष्टीने कोणताही फायदा विद्यार्थ्यांना नाही असे वाटते. खरे अभ्यासतज्ञ या मताशी नक्कीच सहमत असतील.
२०१५ साली अस्तित्त्वात आलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंबंधीच्या कायद्यात प्रवेश परीक्षा रद्द करण्याची मुभा सरकारला आहे असे वाटते.