कॅप नोंदणीला उद्यापासून आरंभ, व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश नोंदणी ऑनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 12:01 PM2023-06-14T12:01:57+5:302023-06-14T12:03:42+5:30
वाचा, कोणकोणत्या अभ्यासक्रमांची नोंदणी सुरू होणार
लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील इंजिनीअरिंग, विधी, कृषी, फार्मसी, एमबीए अभ्यासक्रमांसाठी प्रवेश नोंदणीला १५ जून म्हणजे उद्यापासून सुरुवात होत आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) त्याची तयारी पूर्ण केली आहे. कॅप प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १५ जूनपासून नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे बारावीच्या निकालानंतर आता प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा संपली आहे. यंदा सीईटी सेलकडून राबविण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया पार पडून कॉलेज वेळेत सुरू होण्याची आशा आहे.
करोनामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये प्रवेश प्रक्रिया विलंबाने सुरू झाली. तशात शैक्षणिक वर्ष लांबले होते. आता करोनानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाल्यावर शैक्षणिक वेळापत्रकही जागेवर आणण्याच्या दृष्टीने यावर्षी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. सीईटी सेलकडून पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या १९ प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. त्यातील १८ अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा सीईटी सेलने पार पाडली आहे. यातील १६ परीक्षांचा निकाल जाहीर केला आहे. यंदा सीईटी सेलकडून विविध अभ्यासक्रमांसाठी ९ लाख ३८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.
या अभ्यासक्रमांची नोंदणी सुरू होणार
अभ्यासक्रम- नोंदणी
बीई, बीटेक- १५ जून
एमबीए / एमएमएस- १५ जून
एमसीए- १५ जून
एलएलबी ५ वर्षे- १५ जून
बीए बीएड, बीएससी बीएड ४ वर्षे- १५ जून
बीएड- एमएड- १५ जून
कृषी- १५ जून
बी. फार्मसी- १५ जून
एम फार्मसी - १५ जून
बी. एचएमसीटी- १६ जून
बी. प्लॅनिंग - १६ जून
बीएड अँड ईएलसीटी- १६ जून
एमएड- १६ जून
बी. डिझाइन - १६ जून
एमई, एमटेक- १६ जून
एलएलबी ३ वर्षे- १८ जून
एम.पी. एड - १८ जून
बीपीएड- १८ जून
एम आर्च - १८ जून
एम. एचएमसीटी- १८ जून
बॅचलर ऑफ फाइन आर्ट- २० जून
एम प्लॅनिंग - २० जून
बीएससी नर्सिंग- २० जून
नोंदणी माहितीसाठी सीईटीकडून ॲप
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रम यांच्या प्रथम वर्ष पदवी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असून प्रथमच मोबाइल ॲपमार्फत उमेदवारांना विविध टप्प्यांची माहिती तसेच सूचना व जागा वाटप इत्यादी माहिती मिळणार आहे. सदर मोबाइल ॲपचा वापर विद्यार्थी / पालकांना करता येईल. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविताना ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे. या प्रणालीतून १२ वीचे गुण, अधिवास व राष्ट्रीयत्व, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, जात, जात वैधता, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, तसेच कृषी शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता लागणारा सात-बारा उतारा आदी आवश्यक प्रमाणपत्र / दाखले यांची पडताळणी होणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधी पालक तसेच उमेदवारांच्या समस्या व शंकांचे निरसन करण्यासाठी प्रादेशिक संवाद कार्यक्रम राबविला जाणार आहे.