CBSE 12th Exam: २४ जुलैपासून १२ वीच्या परीक्षा होण्याची शक्यता; शिक्षण मंत्रालयानं बनवले ३ प्लॅन, PMO निर्णय घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 01:30 PM2021-06-01T13:30:37+5:302021-06-01T13:31:57+5:30
केंद्रीय शिक्षणमंत्री १ जून रोजी परीक्षांच्या तारखांची घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु शिक्षण मंत्रालयाने परीक्षेचे नियोजन केले आहे
नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्या लाटेचा धोका समोर आहे. त्यातच बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर न झाल्यानं विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागलं आहे. सुप्रीम कोर्टात परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणीवेळी एक महत्त्वाची बातमी समोर आली. शिक्षण मंत्रालयाने ३ प्रस्ताव तयार करून सरकारकडे पाठवले आहेत आता त्यावर पंतप्रधान कार्यालयाकडून शिक्कामोर्तब होणं गरजेचे आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री १ जून रोजी परीक्षांच्या तारखांची घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु शिक्षण मंत्रालयाने परीक्षेचे नियोजन केले आहे. एका राष्ट्रीय दैनिकाने मंत्रालयाच्या सूत्रांनुसार बातमी दिलीय की, जर केंद्र सरकारने परवानगी दिली तर २४ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान बारावीच्या परीक्षा होऊ शकतात. मागील आठवडाभरात सर्व राज्यांकडून आलेल्या सूचनेनंतर १२ वी बोर्डाच्या परीक्षेसाठी ३ प्लॅन तयार केले आहेत. परंतु यात पीएमओ कार्यालयाकडून काही बदल करण्यात येऊ शकतात.
शिक्षण मंत्रालयाने बनवले ३ प्लॅन
सीबीएसई(CBSE) बोर्डाच्या मदतीनं सरकारने ३ प्रस्ताव बनवले आहेत. त्यात प्लॅन A नुसार सरकार बारावीच्या केवळ मुख्य विषयांसाठीच परीक्षा घेतली जाईल. त्यात सायन्स, कॉमर्स आणि आर्टसच्या ३ मुख्य विषयांचे पेपर घेतले जातील. त्यानंतर निकाल तयार करण्यासाठी उर्वरित विषयांचे सरासरी गुण आणि मुख्य परीक्षेचे नंबर याचा आधार घेतला जाईल.
प्लॅन B नुसार, सीबीएसई या मुख्य विषयांच्या परीक्षा ३० मिनिटांच्या घेऊन त्याचे मुल्यमापन करेल. या परीक्षा अशाप्रकारे तयार करण्यात येतील ज्यात प्रश्नपत्रिकेत केवळ ऑब्जेक्टिव प्रश्न विचारण्यात येतील. परीक्षेत विषयांची संख्याही निश्चित होईल. परंतु राज्यांनी या प्रस्तावावर सहमती दर्शवली नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.
प्लॅन C नुसार, शिक्षण मंत्रालयाने हे सांगितलं आहे की, देशातील अनेक राज्यात कोरोना संक्रमण नियंत्रणात नाही. अशावेळी बोर्डाच्या सगळ्यांनी ९, १० आणि ११ वी तिन्हीचे इंटरनल असेसमेंट करावं आणि याच आधारे विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करावं. त्यानंतर बारावी बोर्डाचा निकाल जाहीर होईल. परंतु सरकार यावर जास्त विचार करू शकत नाही कारण अनेक तज्ज्ञांच्या मते १२ वीच्या परीक्षा घेणं गरजेचे आहे असं म्हंटल आहे.
तर बोर्डाने परीक्षेसाठी सध्या तात्पुरतं वेळापत्रक बनवलं आहे. त्यानुसार परीक्षा दोन टप्प्यात घेतल्या जातील १५ जुलै ते १ ऑगस्ट, तर दुसऱ्या टप्प्यात ६ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट आयोजित केल्या जातील. यात रविवारीही परीक्षा घेण्यात येतील. त्याचसोबतच जर कोणता विद्यार्थी सुरुवातीच्या टप्प्यात कोविड १९ संबंधित मुद्द्यामुळे परीक्षा देण्यासाठी गैरहजर राहिला तर अशा विद्यार्थ्यांना १५ दिवसानंतर होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाला योग्य ते पुरावे द्यावेत.
मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२१ कोविड १९ च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आयोजित करण्यात येईल. परीक्षेत सोशल डिस्टेंसिंग आणि अन्य नियमांचे पालन होईल. तर विद्यार्थी, शिक्षकांचा मोठा वर्ग सोशल मीडियावर सीबीएसई बोर्डाची परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहे. परंतु विद्यार्थी, शिक्षक यांची सुरक्षा आणि भविष्य हे दोन्ही आमच्यासाठी महत्त्वाचं आहे असं शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल म्हणाले आहेत.