सीबीएसई १२वीचे निकाल ३१ जुलैला; मूल्यांकनासाठी ३०:३०:४० टक्क्यांची पद्धत वापरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 07:12 AM2021-06-18T07:12:23+5:302021-06-18T07:12:58+5:30
कोरोनामुळे सीबीएसई १२वीची परीक्षा यंदा रद्द करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात न्या. अजय खानविलकर व न्या. दिनेश माहेश्वरी यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : १२वी परीक्षांच्या मूल्यांकनाची पद्धत सीबीएसईने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला सादर केली व हे निकाल ३१ जुलै रोजी जाहीर करण्यात येतील, असे सांगितले. १०वी, ११वी आणि १२वी या तीन इयत्तांतील गुणांचा विचार करताना ३०:३०:४० टक्के अशा रितीने मूल्यांकन करून विद्यार्थ्याला गुण देण्यात येतील.
कोरोनामुळे सीबीएसई १२वीची परीक्षा यंदा रद्द करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात न्या. अजय खानविलकर व न्या. दिनेश माहेश्वरी यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सीबीएसईने बारावी निकालासंदर्भातील धोरण न्यायालयापुढे स्पष्ट केल्याने विद्यार्थी व पालक यांचा जीव भांड्यात पडला आहे. कोरोना साथ असल्यामुळे विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षा लक्षात घेऊन सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षा यंदा न घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी जाहीर केला होता.
स्थिती सुरळीत झाल्यास प्रत्यक्ष परीक्षा
n बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मिळालेल्या गुणांविषयी विद्यार्थ्यांची काही तक्रार असेल तर ती समस्या सोडविण्याची पद्धतीही तयार ठेवा, असे सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसईला सांगितले.
n कोरोना साथ आटोक्यात येऊन परिस्थिती सुरळीत होईल, त्यावेळेस १२वीची प्रत्यक्ष परीक्षा घेण्यात येणार आहे. सध्याच्या मूल्यांकन पद्धतीबद्दल समाधानी नसणारे विद्यार्थी या परीक्षेला बसून अधिक उत्तम गुण मिळवू शकतात.