CBSE 12th Topper 2022: बारावीच्या परीक्षेत पोरीनं पैकीच्या पैकी गुण मिळवले, तिचा 'फ्युचर प्लान' ऐका...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 06:31 PM2022-07-22T18:31:36+5:302022-07-22T18:32:22+5:30
CBSE 12th Topper 2022, CBSE Board Results 2022: सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
CBSE 12th Topper 2022, CBSE Board Results 2022: सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांमधील स्पर्धा संपुष्टात यावी यासाठी सीबीएसई बोर्डानं मेरिट लिस्ट जाहीर न करण्याचा निर्णय घेतला. यंदा सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना निकालाची खूप वाट पाहावी लागली. या परीक्षेत नोएडाच्या युवाक्षी विज हिनं ५०० पैकी ५०० गुण मिळवले आहेत.
सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत पैकीच्यापैकी गुण प्राप्त करणारी युवाक्षी विज आपल्या भविष्याबाबत खूप सकारात्मक आणि ध्येयवादी आहे. इयत्ता १० वीतच तिनं ९० टक्क्याहून अधिक गुण प्राप्त केले होते. नुकतंच तिनं एका मुलाखतीत तिच्या फ्युचर प्लानबाबत माहिती दिली.
"पैकीच्या पैकी गुण मिळवणं हे माझ्यासाठी सरप्राइज होतं. ज्यावेळी दोन टर्म्समध्ये परीक्षा होणार आहे असं जाहीर झालं तेव्हा मी खरंच खूप संभ्रमात होते. पण कुटुंबानं मला खंबीर पाठिंबा दिला आणि जे मेहनत घेतात त्यांना काहीच फरक पडणार नाही असा विश्वास मला दिला. दोन टप्प्यात सिलेबल्सचा फायदा असा झाला की यामुळे रिवीजन करण्यासाठी वेळ मिळाला", असं युवाक्षीनं सांगितलं.
फ्युचर प्लान काय?
"मी अभ्यास करताना फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायची. त्यावेळी मी इतर कोणत्याही गोष्टींचा विचार करत नाही. अधे-मधे ब्रेकही घ्यायचे. आता सायकोलॉजी ऑनर्स करण्याची इच्छा आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेण्याची माझी इच्छा आहे. कोरोना काळात मला माझ्या कुटुंबीयांकडून आणि शाळेकडून दोन्हीकडून खूप चांगला पाठिंबा मिळाला. त्यामुळेच मी इतके चांगले गुण मिळवू शकले", असंही युवाक्षी म्हणाली.