CBSE Board Exam 2021 : सीबीएसई परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, ४ मे पासून परीक्षा सुरू
By मोरेश्वर येरम | Published: December 31, 2020 07:36 PM2020-12-31T19:36:59+5:302020-12-31T19:39:03+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे.
नवी दिल्ली
CBSE Board Exam 2021 Date Declare: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. कोरोनामुळे सीबीएसईच्या लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा रखडली होती.
सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ४ मे २०२१ पासून सुरू होणार आहेत आणि १० जून पर्यंत संपणार आहेत. तर परीक्षेचा निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर केला जाणार आहे. कोरोनामुळे सध्या शाळा आणि महाविद्यालयांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीनं सुरू आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण शिक्षणमंत्री पोखरियाल यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावत परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचं जाहीर केलं आहे.
Announcing the date of commencement for #CBSE board exams 2021. @SanjayDhotreMP@EduMinOfIndia@cbse@mygovindia@MIB_India@PIB_India@DDNewslivehttps://t.co/PHiz3EwFvz
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) December 31, 2020
"देशातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी कोरोना काळात आव्हानांना सामोरं जात शिक्षण सुरू ठेवलं आहे. शिक्षक तर कोरोना योद्धा बनून काम करत आहेत. आजही काही ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येत नाहीय. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना केबल डीटीएचच्या माध्यमातून टेलिव्हिजनवरुन शिक्षण दिलं गेलं", असं पोखरियाल म्हणाले.
इयत्ता १० आणि १२ वीचे विद्यार्थ्यी मन लावून मेहनत घेत असतील असा विश्वास असल्याचंही पोखरियाल म्हणाले. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि आरोग्याचा विचार करुन परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे, असंही ते म्हणाले.