CBSE 10-12 Exam : उद्या होणार परीक्षांच्या तारखांची घोषणा, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 05:03 PM2020-12-30T17:03:23+5:302020-12-30T17:04:14+5:30
CBSE Exams : सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा उद्या करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वेळही देण्यात येणार असल्याचं केंद्रीय शिक्षणमंत्री मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितलं.
सीबीएसई परीक्षांच्या तारखांची घोषणा लवकरच केली जाणार आहे. उद्या म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी परीक्षांच्या तारखांची घोषणा केली जाईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. उद्या संध्याकाळी ६ वाजता ते परीक्षांच्या तारखांची घोषणा करणार आहेत. कोरोना महासाथीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही मोठा परिणाम झाला आहे. सीबीएसई बोर्डाचे अनेक विद्यार्थी परीक्षांच्या तारखांची वाट पाहत होते. दरम्यान, उद्या संध्याकाळी याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.
"३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता सीबीएसी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांची मी घोषणा करणार आहे," अशी माहिती शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली. शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर डेटशीट सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावरही विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांना cbse.nic.in या संकेतस्थळावर जाऊन डेटशीट डाऊनलोड करता येईल.
"विद्यार्थी आणि शिक्षकांशी चर्चा केल्यानंतर आता आम्ही नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी सीबीएससी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांची घोषमा करणार आहोत. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना तारखांबाबत माहिती मिळेल आणि त्यांच्या मनात असेलला भ्रमही निघून स्थिती स्पष्ट होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी योग्य तो कालावधी मिळालाही आणि मिळेलही, तसंच त्यांच्या परीक्षा कधी आहेत हे स्पष्ट होणार आहेत," असं केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणाले.
मैं अपने सभी विद्यार्थियों, अभिभावकों, शिक्षकों एवं संस्थानों को आश्वस्त करता हूं कि परीक्षाओं संबंधी सभी निर्णय आपके हित एवं उज्ज्वल भविष्य को ध्यान में रखकर ही लिए जाएंगे। https://t.co/xe7USAq85P
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) December 30, 2020
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा केव्हा आणि कशा होणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनात शंका होती. दरम्यान, सरकारनंही परीक्षा घेतल्या जाणार असल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. तसंच या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं नाही तर ऑफलाइन पद्धतीनं घेतल्या जाणार असल्याचंही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं.