सीईटी सेलचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर; विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 07:39 AM2023-08-07T07:39:39+5:302023-08-07T07:39:51+5:30

आरोग्य विद्यापीठाशी संलग्न मान्यताप्राप्त मेडिकल व डेंटल कॉलेजमधील जागांवर सीईटी सेलमार्फत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

CET Cell's mismanagement in the spotlight again; Students' headaches increased | सीईटी सेलचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर; विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली

सीईटी सेलचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर; विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आरोग्य विद्यापीठाकडे मान्यताप्राप्त होण्यासाठी प्रलंबित असलेली महाविद्यालये प्रवेश प्रक्रियेतील यादीत समाविष्ट केल्याने, सीईटी सेलचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. वैद्यकीय शाखेच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होताना, अचानक या यादीतील महाविद्यालयांची नावे गायब झाल्याने विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली आहे. शिवाय, पालक-विद्यार्थ्यांत संभ्रम निर्माण झाल्याने, आता मेडिकल प्रवेश प्रक्रियांना स्थगिती देण्यात आली आहे.

आरोग्य विद्यापीठाशी संलग्न मान्यताप्राप्त मेडिकल व डेंटल कॉलेजमधील जागांवर सीईटी सेलमार्फत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सीईटी सेलने राज्यभरातील महाविद्यालयांमधील जागांची यादी जाहीर केली होती, परंतु विद्यार्थ्यांना जागांचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होताना, अचानक त्यातील काही नावे वगळली. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. प्रवेश प्रक्रिया सुरू असताना, हा प्रकार घडल्याने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा रोष ओढवून घेतला आहे.

या महाविद्यालयांना वगळले
नवी मुंबई टीपीसीटी तेरणा डेंटल महाविद्यालय, तेरणा मेडिकल काॅलेज, वर्धा महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स, पालघर वेदांत मेडिकल काॅलेज, अमरावती डॉ.पंजाबराव देशमुख मेडिकल काॅलेज, कर्जत डॉ.एन.वाय. तासगावकर मेडिकल काॅलेज, कुडाळ सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ मेडिकल काॅलेज, धुळे एसीबीएम मेडिकल काॅलेज.

सीईटी सेलची पश्चात बुद्धी...
या विषयी सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, प्रवेश प्रक्रियेतून जागा वगळलेल्या महाविद्यालयांच्या काही मान्यता आरोग्य विद्यापीठाकडे प्रलंबित आहे. त्यांना अजूनही संपूर्णतः मान्यता न मिळाल्याने, प्रवेश प्रक्रियेत या महाविद्यालयांचा समावेश करता 
येणार नाही. 
पुढील फेऱ्यांमध्ये या महाविद्यालयांमधील जागा प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट केल्या जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहेत. आरोग्य विद्यापीठामार्फत सीईटी सेलला दिलेल्या पत्रानुसार, संबंधित महाविद्यालयाच्या जागा मान्यतेनंतर पूर्ववत करण्याची सूचना देण्यात आली आहे.

Web Title: CET Cell's mismanagement in the spotlight again; Students' headaches increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.