नागपूर आयटीआयमध्ये ‘एरोनॉटिकल’ प्रवेशासाठी चुरस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 03:44 AM2020-08-26T03:44:39+5:302020-08-26T03:45:02+5:30
मिहानमधील दसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लि. या कंपनीशी टायअप झाले आहे. ही कंपनी विद्यार्थ्यांना इन्टर्नशिप करून प्लेसमेंटसुद्धा देणार आहे.
नागपूर : विमानाच्या देखभाल व दुरुस्तीचे प्रशिक्षण महाराष्ट्रात केवळ नागपूरच्या शासकीय आयटीआयमध्ये उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांमध्ये चांगली चुरस असून, अख्ख्या महाराष्ट्रातून अभ्यासक्रमासाठी नोंदणी होत आहे. गेल्यावर्षीपासून हा अभ्यासक्रम सुरू झाला. यंदा दोन तुकड्यांमध्ये ४० जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.
एरोनॉटिकल कंपन्या पूर्वी जनरल फीटर नियुक्त करीत होत्या. पण या अभ्यासक्रमामुळे एरोनॉटिकल क्षेत्रातील तज्ज्ञ फीटर एव्हिएशन कंपन्यांना मिळणार आहेत. त्यासाठी दसॉल्ट एव्हिएशन कंपनी फ्रान्स यांचा केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाशी सामंजस्य करार झाला. या अभ्यासक्रमाची जबाबदारी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय मुंबईने नागपूरच्या शासकीय आयटीआयवर सोपविली. नागपुरातील मिहानमध्ये विमानांच्या देखभाल व दुरुस्ती कंपन्या आपला विस्तार करीत आहे. त्या दृष्टिकोनातून विदर्भातील विद्यार्थ्यांना संधी मिळावी या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. ‘एरोनॉटिकल स्ट्रक्चर अॅण्ड इक्युपमेंट फीटर’ असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे.
२०१९ मध्ये २० विद्यार्थ्यांची पहिली बॅच सुरू झाली. २० जागांसाठी पहिल्याच वर्षी ५७१ अर्ज आले होते. तेव्हा ९३ टक्क्यांपर्यंत कटआॅफ गेला होता. यंदा आयटीआयने दुसरीही तुकडी सुरू केली आहे. त्यामुळे आता ४० जागा आहेत. ९५ टक्के गुण घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे वळले आहेत. संपूर्ण राज्यातून आणि इतर राज्यातूनही या अभ्यासक्रमासाठी विचारणा होत असल्याचे आयटीआयचे प्राचार्य हेमंत आवारे यांनी सांगितले.
प्लेसमेंटची चिंता नाही
मिहानमधील दसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस लि. या कंपनीशी टायअप झाले आहे. ही कंपनी विद्यार्थ्यांना इन्टर्नशिप करून प्लेसमेंटसुद्धा देणार आहे.