फी दिली नाही म्हणून चक्क प्रयोगशाळेत वर्ग, ‘कपोल’ शाळेतील प्रकार, कांदिवली पोलिसांत गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 09:37 AM2022-04-06T09:37:26+5:302022-04-06T09:37:51+5:30

Education News: कांदिवलीच्या महावीरनगर परिसरात असलेल्या कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल शाळेच्या प्राचार्यांसह तिघांवर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी १५ मुलांना फी न भरल्याच्या कारणास्तव वर्गामधून वेगळे करत वर्ग सुटेपर्यंत प्रयोगशाळेत बसवून ठेवले.

Classes in Chakka Laboratory for not paying fees, type in 'Kapol' School, Crime in Kandivali Police | फी दिली नाही म्हणून चक्क प्रयोगशाळेत वर्ग, ‘कपोल’ शाळेतील प्रकार, कांदिवली पोलिसांत गुन्हा

फी दिली नाही म्हणून चक्क प्रयोगशाळेत वर्ग, ‘कपोल’ शाळेतील प्रकार, कांदिवली पोलिसांत गुन्हा

Next

मुंबई : कांदिवलीच्या महावीरनगर परिसरात असलेल्या कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल शाळेच्या प्राचार्यांसह तिघांवर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी १५ मुलांना फी न भरल्याच्या कारणास्तव वर्गामधून वेगळे करत वर्ग सुटेपर्यंत प्रयोगशाळेत बसवून ठेवले. याचा विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम झाला असून त्यांनी शाळेत जाण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी पालकांनी कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली.

कांदिवलीच्या बंदरपाखाडी रोड परिसरात तक्रारदार के. शहा (३६) या राहतात. त्यांची १४ वर्षीय मुलगी या शाळेत नववीच्या वर्गात शिकते. शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल रोजी त्यांची मुलगी सकाळी शाळेत गेली होती. वर्ग भरल्यानंतर प्रार्थना झाली आणि त्यानंतर शाह यांच्या मुलीसह अन्य वर्गमैत्रीणीला बाहेर काढत त्यांना तळमजल्यावर असलेल्या हेड ऑफ दि डिपार्टमेंट यांना भेटण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. इयत्ता नववी आणि दहावीचे २५ विद्यार्थी त्याठिकाणी जमा झाले. मात्र, त्यापैकी ८ ते ९ विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेसाठी पाठविण्यात आले. मात्र, तक्रारदारासह अन्य १५ जणांना त्यांनी त्याच खोलीत दिवसभर बसवून ठेवले. मात्र, या १५ मुलांचा त्या दिवशी वीस मिनिटांचे राकेश सरांचे फक्त १ लेक्चर झाले आणि मुलांना त्यांचा अभ्यास स्वतःच करण्यास सांगून ते निघून गेले. तर १५ मिनिटे प्राचार्यांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या. शाह यांची मुलगी घरी आली तेव्हा तिने हा सगळा प्रकार तिच्या आईला सांगितला. याप्रकरणी त्यांनी मनसेचे विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांच्याशी संपर्क साधला आणि थेट कांदिवली पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी याप्रकरणी प्राचार्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला.

कोरोनाकाळात शाळेकडून आम्हाला कोणताही दिलासा दिला गेला नाही. शाळेच्या कोणत्याही प्रॉपर्टीचा विद्यार्थ्यांनी वापर केला नाही. तर त्याचे पैसे आम्ही का भरायचे? असा आमचा मुद्दा असून त्याबाबत आम्ही काही पालकांनी मिळून उच्च न्यायालयात २८ मार्च रोजी जनहित याचिका दाखल केली आहे. हा प्रकार घडला त्यानंतर आम्ही आंदोलन करू, असे वाटल्याने शाळेने गेट समोर चार बाऊन्सर उभे केले होते. 
- के. शाह, तक्रारदार पालक 

विद्यार्थ्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले. त्यांना अशा प्रकारे वागवल्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला तर जे.जे. कायदा, २००० च्या कलम २३ अंतर्गत दखलपात्र नोंदविला जाऊ शकतो आणि कांदिवलीतील शाळेच्या प्रकरणात पोलिसांनी तेच केले. 
- ॲड. विशाल सत्यप्रकाश सक्सेना - सर्वोच्च न्यायालय  

त्या शैक्षणिक संस्थांची गय करणार नाही
कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक दिली जात होती. त्याची गंभीर दखल शिक्षण विभागाने घेत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या त्रास देणाऱ्या अथवा त्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या शैक्षणिक संस्थांची गय केली जाणार नाही.
- प्रा. वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

Web Title: Classes in Chakka Laboratory for not paying fees, type in 'Kapol' School, Crime in Kandivali Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.