१२ च्या परीक्षेला सुरुवात; शिक्षकांच्या बहिष्कारामुळे निकालावर मात्र प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 05:48 AM2023-02-22T05:48:41+5:302023-02-22T05:49:13+5:30
बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनावर महासंघाने बहिष्कार टाकला असून पुणे येथे मंगळवारी इंग्रजी विषयाची ‘चीफ मॉडरेटर’ ची बैठकीला अनुपस्थिती दर्शविण्यात आली.
मुंबई : राज्यात बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असल्या तरी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कारामुळे निकालाचे काय होणार यावर प्रश्नचिन्ह आहे.
शिक्षण क्षेत्र व शिक्षकांचे प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. वारंवार शासनाला निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याची प्रतिक्रिया कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे मुकुंद आंधळकर यांनी दिली. मागण्यांच्या पूर्ततेसाठी ५ सप्टेंबर शिक्षक दिनापासून वेगवेगळ्या टप्प्यांवर तालुका व जिल्हास्तरावर विविध आंदोलने करण्यात आली. दरम्यान, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक मागण्यांकडे सातत्याने डोळेझाक केल्यामुळे बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनावर महासंघाने बहिष्कार टाकला असून पुणे येथे मंगळवारी इंग्रजी विषयाची ‘चीफ मॉडरेटर’ ची बैठकीला अनुपस्थिती दर्शविण्यात आली. यापुढेही हे आंदोलन तीव्र करण्याची संघटनेची भूमिका असल्याचे मुकुंद आंधळकर यांनी स्पष्ट केले.
मागण्या काय?
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी विना तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सेवानिवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा
१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, निवड श्रेणीसाठीची २० टक्क्यांची अट रद्द करावी, आय.टी. विषय अनुदानित करावा.
अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात, विना अनुदानितकडून अनुदानितमध्ये बदलीला १ डिसेंबर २०२२ पासून लागू केलेली स्थगिती त्वरित रद्द करावी, शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावीत, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी पटसंख्येचे निकष शाळा संहितेनुसार असावेत, एम. फिल.,एम.एड.,पीएच. डी. धारक शिक्षकांना उच्च शिक्षणाप्रमाणे वेतनवाढ लागू करावी व इतर लाभासाठी ग्राह्य धरण्यात यावे, आदींसह विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी हे आंदोलन छेडले आहे.
विद्यार्थ्यांना एसटीचा दिलासा
बारावी आणि दहावीच्या परीक्षा लक्षात घेत एसटी महामंडळाने परीक्षांच्या वेळापत्रकाला अनुसरून गाड्यांच्या वेळेत बदल करण्याच्या सूचना विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत. २१ फेब्रुवारीपासून राज्यभरात बारावीची परीक्षा सुरू झाली; तर ३ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना गाव ते परीक्षा केंद्र असा प्रवास विनासायास व्हावा यासीठ विशेष एसटी गाड्या गरजेनुसार सोडणे, उपलब्ध गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये परीक्षेच्या वेळापत्रकाला अनुसरून विद्यार्थ्यांना येण्या-जाण्याकरिता सोयीचे होईल असा बदल करणे, परीक्षा केंद्रावर जाणारे विद्यार्थी मार्गावर दिसल्यास व त्याने गाडी थांबविण्याची विनंती केल्यास अशा विद्यार्थ्यांना गाडीमध्ये जागा करून देणे, अशा सुविधा देण्यात येणार आहेत. परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार बसेस पुरविण्यात याव्यात. याबाबत कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.