सीईटी निकालानंतर प्रवेश प्रक्रियेची चिंता; यंदाही अभियांत्रिकी जागा रिक्त राहण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 02:31 AM2020-12-01T02:31:02+5:302020-12-01T02:31:15+5:30
काेराेनाचे सावट, गेल्या चार ते पाच वर्षांपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या जागा हजारोंच्या संख्येने रिक्त राहत आहेत.
मुंबई : एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर झाला असला तरी अद्याप अभियांत्रिकी पदवी प्रवेशांबाबत कोणत्याच सूचना सीईटी सेलने जारी केलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेची चिंता सतावत आहे.
यंदा अद्याप सीईटी सेलने उपलब्ध जागांची माहिती दिलेली नाही. कोरोनाचे सावटही सर्वच शैक्षणिक सत्रांवर आहे. एमएचटी-सीईटीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. त्यामुळे डिसेंबरमध्ये अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू होतील. सीईटीला अर्ज भरूनही दीड लाख विद्यार्थी परीक्षेला बसले नाहीत. त्यामुळे प्रवेशासाठी किती विद्यार्थी प्रतिसाद देतील व अभ्यासक्रम कसा असेल, पुढील परीक्षा कधी होतील आदी माहिती सर्वप्रथम सीईटी सेलला विद्यार्थ्यांना द्यावी लागेल.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या जागा हजारोंच्या संख्येने रिक्त राहत आहेत. गेल्या वर्षी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमातील तब्बल ७२,६०० जागा रिक्त होत्या. यंदा कोरोना, उशिरा झालेली सीईटी व प्रवेशाला अद्याप प्रारंभच न झाल्याने प्रवेश पूर्ण करण्यासाठी कसरत सीईटी सेलला करावी लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
अभियांत्रिकी व व्यवस्थापन अभ्यासक्रमांना मागणी नसतानाही या अभ्यासक्रमांच्या जागा दीड लाखाच्या आसपास आहेत. प्रवेशासाठी विद्यार्थीच फिरकत नाहीत तरीही खासगी संस्थाचालकांवरील एआयसीटीईच्या कृपादृष्टीमुळे जागा वाढतात व रिक्त जागांची टक्केवारी फुगते आहे. ज्या अभ्यासक्रमांना विद्यार्थी नाहीत, त्यांच्या जागा वाढू देऊ नयेत, अशी तज्ज्ञांची मागणी आहे.