पदवी प्रवेशाचा तिढा कायम, पारंपरिक अभ्यासक्रमांची सीईटी होणार की नाही, याबाबत संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 11:38 AM2021-08-04T11:38:44+5:302021-08-04T11:39:21+5:30
Education:
मुंबई : राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला, मात्र पदवी प्रवेशाचा तिढा कायम आहे. यंदा बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे पदवी प्रवेशाची प्रक्रिया कशी राबवायची यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. पारंपरिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षांच्या प्रवेशासाठी सीईटी घ्यावी, असे मत अनेक प्राचार्य आणि शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर यासंदर्भात निकालानंतरच निर्णय घेण्यात येणार असून त्यासाठी राज्यातील तेराही विद्यापीठांच्या कुलगुरूंची समिती तयार करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली होती. मात्र अद्याप यावर काहीच निर्णय न झाल्याने आणि पदवी प्रवेशाबाबत स्पष्टता देण्यात न आल्याने विद्यार्थी, पालक संभ्रमात आहेत.
वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, आर्किटेक्ट, कृषी अशा अभ्यासक्रमांसाठी बारावी मंडळाच्या परीक्षेनंतर स्वतंत्र प्रवेश परीक्षा होत असतात, मात्र पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीच्या गुणांवर मेरिट लिस्ट जाहीर होते. पण यंदा मात्र या प्रवेश पद्धतीत बदल होण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वच पारंपरिक विद्यापीठांमध्ये पदवीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्या स्तरावर नियोजन केले जाते आणि ती प्रक्रिया राबवली जाते. मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत येणाऱ्या महाविद्यालयातही प्रवेशावेळी विद्यापीठामार्फत प्रवेशासाठी नोंदणी केली जाते. यानंतर प्रवेश मात्र महाविद्यालय स्तरावर घेतले जातात. मात्र उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून पदवी प्रवेशाबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने, सूचना नसल्याने विद्यापीठाकडून यंदा पदवीपूर्व प्रवेश नोंदणीचीही सुरुवात करण्यात आलेली नाही. काही विद्यापीठांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया असते. यामुळे अकरावीप्रमाणे प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठीही केंद्रीभूत प्रक्रियेचे नियोजन करावे असे मत अनेक प्राचार्य मांडत असल्याने पदवी प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया कशी राबवावी, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच प्रवेश परीक्षा पुरेशी नाही, कारण प्रत्येक शाखेच्या गरजा आणि अभ्यासक्रम वेगवेगळे आहेत. बीएमएस, बीएफएफ, बीएमएम अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा घेणे हा एक पर्याय असल्याचे मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
...तर प्रवेश प्रक्रियेत गोंधळ होण्याची शक्यता
विद्यापीठ स्तरावर योग्य निर्णय घेतला गेला नाही तर प्रवेश प्रक्रियेत गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी प्रत्येक विद्यापीठाने एकसमान पातळीवर निकष निश्चित करणे आवश्यक आहे, असे मत प्राचार्य व्यक्त करीत आहेत. शिवाय बारावीच्या लेखी परीक्षेवर विसंबून न राहता त्यांची बौद्धिक क्षमता विचारात घेतली जावी असे मतही विद्यार्थी मांडत आहेत.