मोठी बातमी! १७ ऑगस्टपासून शाळा सुरू होणार नाही; शिक्षण विभागाच्या निर्णयाला रेड सिग्नल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 12:01 PM2021-08-12T12:01:22+5:302021-08-12T12:03:13+5:30
टास्क फोर्सनं शिक्षण विभागाच्या निर्णयावर आक्षेप घेतल्याने शाळा सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम कायम होता
मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. येत्या १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यात येतील असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याची घोषणा केली होती. मात्र टास्क फोर्सच्या बैठकीत शिक्षण विभागाच्या या निर्णयाला विरोध करण्यात आला.(School Reopening)
टास्क फोर्सनं शिक्षण विभागाच्या निर्णयावर आक्षेप घेतल्याने शाळा सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम कायम होता. मात्र आता राज्य सरकारने शाळा सुरु होण्याबाबत जो निर्णय घेतला होता त्या जीआरला स्थगिती दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्र्यांनी शाळा सुरू होण्याबाबत आक्षेप घेतला होता. शाळा सुरू झाल्यावर कोविड रुग्णांची संख्या वाढू शकते अशी भीती मंत्र्यांनी व्यक्त केली होती. मात्र शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्यावर भर दिला.
पालकांकडून शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण विभागाने सर्व्हे घेतला होता. त्यात ८० टक्के पालकांनी शाळा सुरु कराव्यात असा कौल दिला होता. सर्व्हेच्या आधारावर शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तुर्तास हा निर्णय थांबवला असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने शिक्षण विभागाच्या या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर आता १७ ऑगस्टपासून शाळा सुरू होणार नाहीत.
शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर
१७ तारखेपासून शाळा सुरू करण्यासाठी जे आदेश काढले होते, त्यात कशा पद्धतीने सुधारणा करता येतील यावरही तातडीने निर्णय घेतला जाईल. मात्र लगेच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेता येणार नाही असं राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले. ज्या जिल्ह्यात सलग तीन आठवडे एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही, असे शहर किंवा जिल्हे शाळा सुरू करण्यासाठी पात्र धरावेत, अशी ही चर्चा टास्क फोर्सच्या बैठकीत झाली. पेडियाट्रिक टास्क फोर्सच्या प्रमुखांनी जी उदाहरणे दिली आहेत, त्यांचाही अभ्यास करून तातडीने त्याची माहिती गोळा करण्याचे आदेश आपण दिल्याचे कुंटे यांनी सांगितले.
शिक्षण विभागाचा निर्णय काय होता?
ग्रामीण भागात पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली होती. प्रत्येक वर्गात कमाल २० विद्यार्थ्यांनाच परवानगी दिली होती. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दोन सत्रांत होतील असं सांगितलं होतं. शाळा सुरू करण्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी जारी केल्या होत्या. चौथीपर्यंतच्या शाळा मात्र बंद राहतील. ग्रामीण भागात आठवी ते बारावीचे वर्ग आधीपासूनच सुरू आहेत