अकरावी प्रवेश! कटऑफ नव्वदीपार, तरीही झाली घसरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 08:52 AM2021-08-28T08:52:02+5:302021-08-28T08:52:48+5:30
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी : मागील वर्षीच्या तुलनेत २ ते ३ टक्क्यांची घट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह अन्य बोर्डाच्या दहावीच्या निकालात वाढ झाल्याने अकरावी प्रवेशाचा कटऑफही वाढणार, अशी शक्यता होती. परंतु या प्रवेशाच्या पहिल्या नियमित गुणवत्ता यादीचा कट ऑफ हा गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन ते तीन टक्क्यांनी कमी झाला आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयांचा विज्ञान शाखेसह कला शाखेचाही कटऑफ या वर्षीही नव्वदीपार असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरण झाली आहे.
मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ३७ हजार असताना केवळ १ लाख ९१ हजार विद्यार्थीच प्रवेशासाठी पात्र झाले. तब्बल ४६ हजार ८६९ विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग न भरणे, तो सबमिट न करणे, शुल्क निश्चिती न करणे अशा कारणास्तव आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण न केल्याने ते प्रवेश फेरीसाठी पात्र ठरू शकले नाहीत. त्यामुळे यंदाच्या पहिल्या फेरीपासून बहुतांश गुणवंत विद्यार्थी वंचित राहिले आणि मागील वर्षीच्या पहिल्या गुणवत्ता यादीच्या तुलनेत कटऑफ न वाढता काही ठिकाणी सारखाच राहिला तर काही ठिकाणी त्यात घसरण झाली.
असा चढ-उतार...
भवन्स महाविद्यालयाच्या कला शाखेच्या कटऑफमध्ये मागील वर्षीपेक्षा ३ टक्क्यांची, वाणिज्य ८ टक्क्यांची तर विज्ञान शाखेमध्ये ३ टक्क्यांची घसरण झाली. रुपारेल महाविद्यालयाच्या कला शाखेच्या कटऑफमध्ये ३ टक्क्यांची, वाणिज्य २ टक्क्यांची, विज्ञान शाखेत २ टक्क्यांची घसरण आहे. सेंट झेविअर्सच्या कला आणि विज्ञान शाखेच्या कटऑफमध्ये प्रत्येकी १ टक्क्याची वाढ आहे. एनएम महाविद्यालयाच्या वाणिज्यच्या कटऑफमध्ये आणि डहाणूकर महाविद्यालयाच्या कला आणि वाणिज्यच्या कटऑफमध्ये तसेच एचआर महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या कटऑफमध्येही मागील वर्षीच्या तुलनेत जास्त फरक नाही. याचप्रकारे इतर महाविद्यालयांच्या कटऑफमध्ये चढ-उतार दिसत आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुन्हा ३० ऑगस्टपर्यंत ती पूर्ण करण्याची संधी प्रवेश प्रक्रिया संचालनालयाकडून दिली जाणार आहे. त्यामुळे पहिल्या फेरीसाठी कटऑफ वाढला नसला तरी दुसऱ्या फेरीत तो वाढण्याची शक्यता अभ्यासक आणि प्राचार्यांकडून व्यक्त होत आहे.