शाब्बास पोरा! वडील रोजंदारी मजूर, मुलगा भारतीय सैन्यात झाला अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 14:32 IST2024-12-15T14:30:29+5:302024-12-15T14:32:09+5:30
रोज 100 रुपये कमावणाऱ्या मजुराचा मुलगा सैन्यात अधिकारी झाला.

शाब्बास पोरा! वडील रोजंदारी मजूर, मुलगा भारतीय सैन्यात झाला अधिकारी
Success Story : आयुष्यात मोठे काम करण्याचा निश्चय केला, तर जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. एका तरुणाने ही गोष्ट खरी करुन दाखवली आहे. अतिशय गरीब घरात जन्मलेल्या आणि गरिबीत आयुष्य काढणाऱ्या तरुणाने असे काम करुन दाखवले, ज्यामुळे त्याच्या वडिलांचीही छाती अभिमानाने फुलून निघाली आहे. ही गोष्ट भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट झालेल्या 23 वर्षीय कबिलन व्ही यांची आहे. शनिवारी झालेल्या इंडियन मिलिटरी अकादमीच्या पासिंग आऊट परेडनंतर तो अधिकृतपणे भारतीय लष्करात सामील झाला. हा क्षण त्यांच्यासाठीच नाही, त्यांच्या कुटुंबासाठीही अभिमानाचा होता.
वडील मजूर, मुलगा सैन्यात अधिकारी
कबिलन तामिळनाडूच्या मदुराईजवळ असलेल्या मेलूर या छोट्या गावातील रहिवासी आहेत. त्यांचे वडील वेत्रीसेल्वम पी 100 रुपये रोजाने मजूर म्हणून काम करायचे. पण, आता अर्धांगवायू झाल्यामुळे ते व्हीलचेअरवर असतात. आपल्या मुलाच्या यशाने ते खूप खूश आहे. काबिलनच्या आईचे तीन वर्षांपूर्वी कर्करोग आणि कोविड -19 मुळे निधन झाले आहे.
कबिलन काय म्हणाले?
आपल्या यशाबाबत सांगताना काबिलन म्हणतात, 'मी अनेकदा अपयशी ठरलो, पण संरक्षण दलात सामील होण्याचे स्वप्न होते. म्हणूनच मी कठोर परिश्रम केले आणि आज भारतीय सैन्यात दाखल झालो. हे फक्त माझे वैयक्तिक यश नाही, तर ते भारतीय सैन्यात सामील होऊ इच्छिणाऱ्या सर्वांचे आहे. फक्त 100 रुपये रोज कमावणाऱ्या मजुराचा मुलगा हे करू शकतो, तर कोणीही करू शकतो.
प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेतून
मेलूर गावात वाढलेल्या कबिलन यांचे प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेतून झाले असून, अण्णा विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. सैन्यात भरती होण्यासाठी त्यांनी अनेकदा अर्ज केले होते, परंतु प्रत्येक वेळी त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. मात्र त्यांनी हार मानली नाही आणि आज त्याचा परिणाम सर्वांसमोर आहे.
नोकरीबरोबरच अभ्यास
आई गमावल्यानंतर कबिलन यांनी कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांचा धाकटा भाऊ सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत असल्याने आणि त्याच्या वडिलांची तब्येत बरी नसल्याने, कबिलनने अभ्यासासोबतच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) अंतर्गत बचाव दलातही पर्यवेक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नोकरी करत त्यांनी अभ्यास सुरू ठेवला आणि यश संपादन केले.