‘नीट पीजी’ ६ ते ८ आठवडे पुढे ढकलली, केंद्राचा निर्णय; एमबीबीएस विद्यार्थ्यांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 06:46 AM2022-02-05T06:46:32+5:302022-02-05T06:46:59+5:30
Exam News : यंदाच्या वर्षी होणारी नीट पीजी परीक्षा सहा ते आठ आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी होणारी नीट पीजी परीक्षा सहा ते आठ आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा येत्या १२ मार्चला होणार होती. नीट पीजी २०२१ चे काउन्सिलिंग सध्या सुरू असून, त्याच कालावधीत ही परीक्षा होणार होती. त्यामुळे ती पुढे ढकलावी, अशी मागणी अनेक डॉक्टरांनी केंद्र सरकारकडे केली होती.
राष्ट्रीय परीक्षा मंडळाशी (एनबीई) सल्लामसलत करून केंद्रीय आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. नीट पीजी परीक्षा व गेल्या वर्षीच्या नीट पीजीचे काउन्सिलिंग एकाच वेळी आल्याने अनेक परीक्षार्थींनी त्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. यंदा नीट पीजी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी त्यांनी केली, अन्यथा त्यांना मे किंवा जून महिन्यात होणाऱ्या पीजी काउन्सिलिंगमध्ये सहभागी होता आले नसते. या सर्व स्थितीचा आढावा घेऊन यंदाची नीट पीजी परीक्षा सहा ते आठ आठवडे पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी घेतला आहे. १२ मार्चला होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलावी, या मागणीसाठी एमबीबीएसच्या सहा विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. देशात कोरोनाच्या साथीमुळे एमबीबीएस डॉक्टरांची इंटर्नशिप स्थगित झाली आहे. ती ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावी, असे बंधन घालण्यात आले होते.
मंगळवारी होणार याचिकेची सुनावणी
नीट पीजी परीक्षा सहा ते आठ आठवडे लांबणीवर टाकण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. मात्र हा कालावधी आणखी वाढविण्यात यावा, असे काही एमबीबीएस विद्यार्थ्यांचे मत आहे. यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर मंगळवारी, ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.