डिप्लोमा प्रवेशाला सुरूवात; एक लाखाहून अधिक जागांकरिता तीन प्रवेश फेऱ्या
By रेश्मा शिवडेकर | Published: May 28, 2024 07:30 PM2024-05-28T19:30:31+5:302024-05-28T19:30:48+5:30
डिप्लोमाला २०२०-२१ मध्ये उपलब्ध जागांच्या ६० टक्के इतके प्रवेश झाले होते. ही टक्केवारी २०२३-२४मध्ये ८७वर गेली आहे
मुंबई - दहावीनंतरच्या पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाच्या जवळपास ४०० शिक्षण संस्थांमधील एक लाख पाच हजार जागांवरील प्रवेशाकरिता तीन कॅप फेऱ्या घेण्यात येणार आहेत.
यंदा डिप्लोमा प्रवेशात एसईबीसी (मराठा आरक्षण) विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा आरक्षित असतील. तसेच वर्किंग प्रोफेशनल आणि बारावीच्या उत्तीर्णांना थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश दिला जाणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. मंगळवारपासून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेशाची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू कऱण्यात आली.
डिप्लोमाला २०२०-२१ मध्ये उपलब्ध जागांच्या ६० टक्के इतके प्रवेश झाले होते. ही टक्केवारी २०२३-२४मध्ये ८७वर गेली आहे. गेली चार वर्षे डिप्लोमा प्रवेशात वाढच होते आहे. डिप्लोमात सिव्हील, इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल, अणुविद्युत, कॉम्प्युटर, केमीकल या मुख्य शाखा आहेत. डिप्लोमाच्या प्रवेशासाठी तंत्रशिक्षण विभागाच्या https://dte.maharashtra.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करता येईल.
डिप्लोमाचे प्रवेश
वर्ष…………शिक्षणसंस्था…. झालेले प्रवेश…… प्रवेशाची टक्केवारी
२०२०-२१……..३७६…………….६२,१२२……………६०२०२१-२२……..३६७…………….६९,७०५……………७०
२०२२-२३……३६५…..………….८४,४५२…………….८५
२०२३-२४……३८८………………८६,४६५…………….८७
यंदा उपलब्ध जागा
संस्था - ३९०
जागा - १.०५ लाख
प्रवेशासाठी सुविधा केंद्रे - ३१६
कॅप फेऱ्या - तीन
ठळक बदल
* एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी एकूण प्रवेश क्षमतेच्या १० टक्के जागा आरक्षित
* थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी वर्किंग प्रोफेशनलकरिता स्वतंत्र तुकडी. हे वर्ग सकाळी, रात्री व सुटीच्या दिवशी घेण्यात येतील.
* थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश - विद्यार्थ्याना पदविका अभ्यासक्रमाची शाखा त्याने बारावी परीक्षेत उत्तीर्ण केलेल्या विषयानुसार निवडता येईल.