...अन् तिनं डॉक्टर व्हायचं ठरवलं; सचिन तेंडुलकर जिच्या मदतीला धावला, त्या दीप्तीची प्रेरणादायी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 05:40 PM2021-07-28T17:40:15+5:302021-07-28T17:41:48+5:30
लांजा तालुक्याच्या सिमेवरील राजापूर तालुक्यातील झर्ये हे अतिशय दुर्गम गाव... तिथे जाण्यासाठी नेमक्याच गाड्या, त्यामुळे नागरिकांचा संपर्क कमी प्रमाणात होता. इंटरनेटची सोय नसल्यानं तिला ऑनलाईन शिक्षणासाठी दूर रेंज मिळेल तिथे जाऊन बसावं लागायचे...
- अनिल कासारे / लांजा
आर्थिक परिस्थिती बेताची असतानाच वडील आजारी पडले, त्यांच्या उपचारासाठीचा खर्च करण्याची कुटुंबाची ऐपत नव्हती. मग इतरांकडून पैसे जमा करून वडिलांवरील शस्त्रक्रिया केली. पण, तिनं मात्र या प्रसंगातून सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्याचा विडा उचलला अन् डॉक्टर बनण्याचा निर्धार केला. पण, डॉक्टर बनणे हेही खर्चिक, त्यामुळे तिनं मदतीचं आवाहन केलं अन् तिच्या मदतीला 'क्रिकेटचा देव' धावून आला. भारतरत्न सचिन तेंडुलकरची संस्था सेवा सहयोग फाऊंडेशन पुढे आली आहे आणि दीप्तीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे.
लांजा तालुक्याच्या सिमेवरील राजापूर तालुक्यातील झर्ये हे अतिशय दुर्गम गाव... तिथे जाण्यासाठी नेमक्याच गाड्या, त्यामुळे नागरिकांचा संपर्क कमी प्रमाणात होता. झर्ये येथील दशरथ विश्वासराव हे लांजा तालुक्यातील कोंडगे येथील नावेरी सहकारी पतसंस्थेत क्लार्क म्हणून काम करतात, तर आई गृहिणी आहेत. या दांपत्याला पहिली मुलगी दीप्ती, तर छोटा भाऊ असे चार जणांचे कुटुंब. दीप्तीचे प्राथमिक शिक्षक कोंडगे येथील शाळेत झाले. ती पहिलीपासूनच हुशार होती आणि तिनं शाळेच्या विविध स्पर्धा परिक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. सहावीत ती नवोदय परिक्षेला बसली होती आणि त्यात तिने चांगले गुण प्राप्त केल्याने पुढील शिक्षणासाठी तिला नवोदय शाळा राजापूर येथे जावे लागले.
नवोदय राजापूर येथे शिक्षण सुरू असतानाच वडील आजारी पडले. त्यांच्यावर चार ते पाच शस्त्रक्रिया होणे गरजेचे होते . मात्र यासाठी येणारा खर्च खूप होता. वडिलांची होणारी तगमग तिला पहावत नव्हती, आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून वडिलांवर वेळेवर उपचार होत नाहीत, हे तिच्या बालमनावर कोरले गेले होते. वडिलांनी इकडून तिकडून पैसे जमा करुन शस्त्रक्रिया केल्या. "आपल्यासारखी अशी कित्येक कुटूंब असतील की ज्यांना पैसे नाहीत म्हणून उपचार करुन घेता येत नाहीत. अशा गोरगरीब लोकांची सेवा करण्यासाठी आपल्याला डॉक्टर होणे गरजेचे आहे," अशा निश्चय दीप्तीने त्यावेळी मनाशी केला. तिनं जिद्द , चिकाटी , मेहनतीच्या जोरावर दहावीच्या परिक्षेत ९४ आणि बारावीमध्ये ९५.३० गुण प्राप्त केले.
Dipti Vishvasrao from Zarye, Ratnagiri is now all set to become the 1st doctor from her village. Thanks to @sachin_rt’s involvement!
— Seva Sahayog Foundation (@sevasahayog) July 27, 2021
Her dream of going to medical college is now within reach. Thank you Sachin, for being part of Dipti’s, and several other students’ journey. pic.twitter.com/kTCGWi8o6h
दीप्तीने बारावी सायन्स पास झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता परिक्षेचा ( नीट) परिक्षेचा अभ्यास करण्यास जोमाने सुरुवात केली. मात्र झर्ये गावात मोबाईलची रेंज नसल्याने ऑनलाईन शिक्षण घेणे कठीण होवून बसले होते, अशात तिनं आरगांव येथे मामाच्या गावामध्ये जावून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मामेभाऊ शैलेश खामकर यांने देखील तिला मदत केली. कोणतीही खाजगी शिकवण नसतानाही दीप्ती राष्ट्रीय पात्रतेसह प्रवेश परिक्षा ( नीट ) चांगल्या गुणांनी पास झाली. डॉक्टर होण्याच्या विचाराने झपाटेल्या दीप्तीने एम. बी. बीएस डॉक्टरीसाठी प्रवेश अर्ज दाखल केला. त्यानुसार तिला अकोला येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. या शिक्षणासाठी येणारा खर्च प्रचंड असल्याने सामाजिक संस्था , सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडे मदतीचे हात पुढे करण्यावाचून पर्याय नव्हता.
Dipti's journey is a shining example of chasing one's dreams and making them a reality.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 27, 2021
Her story will inspire many others to work hard towards their goals.
My best wishes to Dipti for the future! https://t.co/n4BMOuP1yp
तिनं मदतीसाठी सोशल मिडियाचा आधार घेतला आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर याची संस्था पुढे आली. सेवा सहयोग फांऊंडेशन दीप्तीचा डॉक्टर होण्यासाठी येणारा सर्व खर्च उचलणार आहेत. सचिन तेंडुलकरच्या या मदतीमुळे दीप्ती आता सर्वसामान्य कुटूंबातील गावातील पहिली डॉक्टर होण्याचे पूर्ण करू शकणार आहे. शिक्षणाचा सर्व खर्च उपलब्ध करून दिल्याने सचिनची मी आभारी असल्याचे सांगत दीप्ती विश्वासराव म्हणाली की, मी परिश्रम घेत शिक्षण पूर्ण करेन आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांनाही मदत करेन, असा विश्वास मी सचिनला देत आहे. इकडे, सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर पोस्ट टाकून दीप्तीचे अभिनंदन केले आहे. तिचा संघर्ष तिच्याप्रमाणेच इतर मुलांनाही शिक्षणासाठी कठोर परिश्रम घेण्यासाठी प्रेरणा देईल, असेही सचिनने म्हटले आहे.