शुल्क भरले नाही म्हणून हॉल तिकीट अडवू नका; एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित नको
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 06:39 AM2023-02-21T06:39:12+5:302023-02-21T06:39:26+5:30
आर्थिक परिस्थितीमुळे शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे
मुंबई : कोरोना काळानंतर अनेक विद्यार्थी आणि पालक यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्यामुळे अनेकांना शाळेचे पूर्ण शुल्क भरता आलेले नाही. त्यामुळे दहावी- बारावीच्या परीक्षांच्या तोंडावर हॉल तिकिटासाठी विद्यार्थ्यांची अडवणूक होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळाकडून विभागीय मंडळांना देण्यात आल्या आहेत.
आर्थिक परिस्थितीमुळे शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र ही पर्यायी व्यवस्था यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या परीक्षेसाठीच उपलब्ध असेल, असे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षेचा अर्ज भरलेला कोणताही विद्यार्थी शुल्क न भरल्याच्या कारणामुळे परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता विभागीय मंडळांनी घेण्याच्या सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केल्या आहेत. गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक विद्यार्थी नोंदणी यंदा झाली असून, ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर १४ लाख ५७ हजार २८३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होत आहे. तर दहावीची राज्यातून १५ लाखांहून अधिक नोंदणी झाली आहे.
अशी असावी कार्यवाही
- शालेय शुल्क न भरल्याने मंडळाच्या १० वीच्या परीक्षेचे हॉलतिकीट शाळांकडून मिळण्यासाठी विद्यार्थ्यांची अडवणूक होत असल्यास किंवा त्यांना हॉलतिकीट प्राप्त होत नसल्यास अशा विद्यार्थ्याने शाळेशी संबंधित शिक्षण निरीक्षक/ शिक्षण उपनिरीक्षक/ शिक्षण प्रमुख/ शिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
- शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचा तपशील विभागीय मंडळाकडे सादर करीत हॉल तिकिटासाठी पाठपुरावा करावा.
- विभागीय मंडळाचे सचिव किंवा अध्यक्षांनी, राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट सॉफ्ट कॉपी स्वरूपात शिक्षणाधिकारी यांना अधिकृत मेलवर उपलब्ध करून द्यावे.
- हॉल तिकिटासाठी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा एकत्रित अहवाल विभागीय मंडळांनी राज्य मंडळाला उपलब्ध करून देणे आवश्यक असणार आहे.